विदर्भातील अष्टविनायक : पंचमुखी गणेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:34 AM2021-09-13T04:34:14+5:302021-09-13T04:34:14+5:30
अशोक पारधी पवनी : विदर्भातील अष्टविनायकांत महत्त्वपूर्ण मानल्या जाणारा पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...
अशोक पारधी
पवनी : विदर्भातील अष्टविनायकांत महत्त्वपूर्ण मानल्या जाणारा पवनी येथील पंचमुखी गणेश नवसाला पावणारा म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सातशे-साडेसातशे वर्षापूर्वी पंचमुखी गणेशमूर्तीची स्थापना झाली असावी, त्यामुळे त्याची गणना प्राचीन मंदिर म्हणून केली जात आहे. गणेशोत्सव व इतरही वेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते पण गत दीड वर्षापासून कोरोना प्रभावामुळे अष्टविनायक बंदिवासात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी नगरात शंभराहून अधिक मंदिर सुस्थितीत आहेत. गणेश मंदिरात पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश, रांझीचा गणपती अशी तीन मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी विठ्ठल गुजरी वाॅर्डातील पंचमुखी गणेशाला विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानले जात आहे. पंचमुखीला सर्वतोभद्र असेही संबोधले जाते. सातशे-साडेसातशे वर्षापूर्वी स्थापना झालेल्या या मंदिरातील गणेशमूर्ती शमी वृक्षावर कोरलेली आहे असा समज आहे पण पवनीतील इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक नामदेव हटवार यांच्या मते मूर्तीची स्थापना अकराव्या शतकातील असून ही मूर्ती शिळेवर कोरलेली आहे. एका शिळास्तंभावर चारही बाजूंना श्री गणेशाची प्रतिमा तर पाचवी प्रतिमा नैर्ऋत्य दिशेला कोरलेली आहे. त्यामुळेच पंचमुखी असे संबोधले जात आहे. मूर्ती ३२ इंच उंचीची असून पूर्व पश्चिम लांबी १७ इंच, उत्तर दक्षिण रुंदी १५ इंच आहे. मूर्तीचे हातात लाडू व परशू स्पष्टपणे दिसत आहे. डोक्यावर मुकुट धारण केलेला आहे. नैर्ऋत्य व पश्चिम दिशेच्या प्रतिमा सरळ उभ्या असून सोंडदेखील सरळ आहे. मूर्तीचा वरचा भाग ११ इंच निमुळता आहे. मूर्ती जमिनीत दीड फूट खोल असावी.
मूर्तीला सेंदूर लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे मूर्तीचे विलोभनीय रूप स्पष्ट दिसत नाही. तरीसुद्धा मूर्ती अतिशय आकर्षक आहे. श्री गणेश मंदिर उत्तरामुखी आहे. समोरच्या बाजूला कोरीव नक्षीकाम केलेले एक खांब आहे. भट कुटुंबीयांचे कुलदैवत आहे असे मंदिराची देखभाल व पूजापाठ करणारे अरविंद भट यांचे म्हणणे आहे. पूर्वी ओसरीवजा कौलारू इमारतीची जीर्णोद्धार त्यांनी स्वखर्चाने केला आहे. जागृत देवस्थान असल्याने गणेशोत्सवात गर्दी असते पण कोरोना प्रभावामुळे यावर्षी मंदिर बंद आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असल्याने विदर्भातील भाविक भक्तांनी यापूर्वी कित्येकदा दर्शनासाठी पवनी गाठली आहे.
120921\img_20210911_205041.jpg
पंचमुखी श्री गणेश मूर्ती.