सरकारच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा
By admin | Published: April 2, 2017 12:26 AM2017-04-02T00:26:53+5:302017-04-02T00:26:53+5:30
आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची केंद्र व राज्यात सरकार आहे. या लोकप्रतिनिधींना धानाच्या, तुरीच्या व अन्य पिकांच्या दराबाबत आपण जाब विचारायला हवा.
प्रफुल पटेल यांचे प्रतिपादन : दिघोरीत ग्रामपंचायत सभागृहाचे लोकार्पण, दिघोरीच्या पायलट कन्येचा सत्कार
दिघोरी (मोठी) : आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची केंद्र व राज्यात सरकार आहे. या लोकप्रतिनिधींना धानाच्या, तुरीच्या व अन्य पिकांच्या दराबाबत आपण जाब विचारायला हवा. तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, असे प्रतिपादन दिघोरी (मोठी) येथील ग्रामपंचायत सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक पाहुणे म्हणून खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
खासदार पटेल म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असून ज्याच्या भरवशावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशा शेतकऱ्याला केंद्र व राज्य सरकारने भरभरून मदत द्यायला हवी. परंतु हे सरकार मदत करणे सोडून शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्याऐवजी खालावत चालला आहे. आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या धानाला तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत दर मिळत होते. परंतु या सरकारमध्ये दोन हजाराच्या वर भाव मिळणे कठीण झाले आहे. तसेच तुरीचे खरेदी केंद्र उघडल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तूर डाळ खरेदीचा मुहुर्तच या सरकारला सापडलेला नाही.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुनिल फुंडे, धनंजय दलाल, सरपंच शंकरराव खराबे, उपसरपंच टिकाराम देशमुख, जि.प. सदस्य माधुरी हुकरे, पं.स. सदस्य गुलाब कापसे, सचिव टी.एम. कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस लाखांदूर तालुका अध्यक्ष बालू चुन्ने, नरेश डहारे सभापती, दिपक चिमणकर, मार्कंड हुकरे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
खासदार प्रफुल पटेल म्हणाले, मी सरकारमध्ये असताना तुमच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. हजारो तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. असाच एक महत्वाकांक्षी भेल प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु सरकार बदलताच भेल प्रकल्प बंद करण्यात आला. हजारो बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या संधी वाया गेल्या. मी चॉकलेट वाटत नाही तर जे बोलतो ते करून दाखवतो. आता चॉकलेट वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाणीव करून द्यावी. तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणते विकास कामे केली हे आपल्या मनाला विचारा. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
तत्पूर्वी खासदार प्रफुल पटेल यांनी ग्रामपंचायत सभागृहाच्या कक्षाची फित कापून विधिवत लोकार्पण केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे लोकार्पण यावेळी खासदार पटेल यांचे हस्ते पार पडले.
त्यानंतर दिघोरी (मोठी) चे नाव सातासमुद्रापलिकडे नेणारी पायलट कन्या मोनिका रमेश खराबे हिचा गौरव खासदार पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.तीन महिन् यांपूर्वीच मोनिका खराबे ही "जेट एअरवेज" या नामांकीत विमानसेवा कंपनीत रूजू झाली आहे हे उल्लेखनीय.
लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच शंकरराव खराबे व दिपक चिमणकर यांनी केले. संचालन एम.डी. यांनी केले. तर आभार सचिव टी.एम. कोरे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)