डांबरीकरणाच्या रस्त्याला मुरूम-गिट्टीने डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:03+5:302021-01-01T04:24:03+5:30
विरली (बु.) : सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी विरली-ढोलसर रस्ता दुरूस्तीचे काम करतांना संबंधित कंत्राटदाराने या डांबरीकरणाच्या रस्त्यावरील खड्डे मुरूम-गिट्टीने बुजविण्यात ...
विरली (बु.) : सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी विरली-ढोलसर रस्ता दुरूस्तीचे काम करतांना संबंधित कंत्राटदाराने या डांबरीकरणाच्या रस्त्यावरील खड्डे मुरूम-गिट्टीने बुजविण्यात आले. मात्र, अद्याप या खडीकरणावरून डांबरीकरण करण्यात आले नाही. परिणामी आता या रस्त्यावरील खड्डे जैसे थे झाले असून रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.
सध्या या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेली गिट्टी इतस्ततः विखुरली असून रस्त्यावरून कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. विरली (बु.) येथून अड्याळ-कोंढा मार्गे भंडाऱ्याला जाणाऱ्या बसेस याच रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे लाखांदूर-पवनी येथे शिक्षणासाठी ये-जा करणारे ढोलसर येथील विद्यार्थीही याच रस्त्याने विरलीपर्यंत सायकलने ये-जा करतात. या रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे की समोरून एखादे मोठे वाहन आल्यास दुचाकी चालकांची तारांबळ उडते. वेळप्रसंगी या रस्त्यावर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.