आंधळगाव ते धुसाळा रस्त्याचे डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 05:00 AM2022-04-11T05:00:00+5:302022-04-11T05:00:36+5:30
अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या मोहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कमालीची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आले. परंतु रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित न केल्यामुळे गिट्टी व मुरूम बाहेर निघाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे.
यासंबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. बांधकाम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुसाळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सेलोकर, देवा पुडके, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशील बोपचे, प्रवीण सेलोकर, गुरुदेव सेलोकर, अक्षय बोंद्रे, स्वप्नील सेलोकर, शामदादा कोसरे, भावेश निमकर, स्वप्नील वणवे, अंकित सेलोकर तसेच नवेगाव व धुसाळा येथील नागरिकांनी दिला आहे.
आमचा जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय?
- माेहाडी तालुक्यातील धुसाळा ते आंधळगाव हा रस्ता रहदारीचा आहे. मात्र तरीही याकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष हाेत आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण या रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याने आमचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय? असा संतप्त सवाल धुसाळा, आंधळगावसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.