अतिक्रमण न काढता केले रस्त्याचे डांबरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:38+5:30
भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनासमोरपर्यंत (कालवा रोड)च्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढता रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना डांबरीकरणानंतर अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
सामाजिक न्याय भवन ते राजीव गांधी चौकापर्यंतचा रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. सिमेंट रस्त्यावरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. आता तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत काहींनी घरांचे बांधकाम व कंपाऊंड रस्त्यापर्यंत केले आहे. आधी ही जागा नहराची असल्याने जागा मोठी होती. आता बांधकाम झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा व नंतरच डांबरीकरणाचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या निवेदनात परिसरातील जवळपास ७५ कुटुंब प्रमुखांनी स्वाक्षरीसह निवेदन प्रशासनाला दिले होते.
भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.
आता या मार्गावर प्रचंड रहदारी असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर नामवंत दवाखानेसुद्धा आहेत. याशिवाय सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळही मोठी असते. परिणामी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा, अशी मुख्य मागणी आहे. आता तर अतिक्रमण न काढताच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.
वर्दळीचा मार्ग
शहरातील अनेक मार्ग वर्दळीचे आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनाकडे निघणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. आता या वर्दळीचा रस्त्यावरील अतिक्रमण न काढता डांबरीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. आधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक येथून रहदारी करणे टाळायचे. मात्र सद्यस्थितीत डांबरीकरण रस्त्याने जाण्यासाठी अनेक जण या रस्त्याचा उपयोग करीत आहेत.