विधानसभेच्या आटोपल्या; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:16 AM2024-11-28T11:16:06+5:302024-11-28T11:18:04+5:30

पदाधिकाऱ्यांचा एकच सवाल : नगरसेवकांची भासू लागली उणीव

Assembly ends; When will the local government elections be held? | विधानसभेच्या आटोपल्या; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार?

Assembly ends; When will the local government elections be held?

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. आता जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे लागले आहे. सरकार सत्तेत आरूढ होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घोषित करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषतः एकट्या भंडारा शहरातच पावणेतीन वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक राज आहे. अन्य पालिकांबाबतही असेच चित्र आहे.


विधानसभेची निवडणूक पार पडली असून, सत्ताधारी 'महायुती'ला मोठे यश मिळाले आहे. दुसरीकड गत अडीच वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. माजी नगरसेवक व निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांना या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती सरकारने कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सध्याच्या परिस्थितीत ९५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.


परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत दबाव वाढत असल्याने या निवडणुका घेण्याच्या हालचाली केव्हा सुरू होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने या निवडणुका तातडीने घेतल्या जातील, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून जवळपास ३३ महिने उलटले आहेत, त्यामुळे पालिकेवर दीर्घ काळापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे.


त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पालिकेतील थेट सहभाग संपुष्टात आला आहे. मात्र, नगरसेवकच नसतील तर आमची कामे कशी होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यांची कामे होत नसल्याने नागरिक चिंतित असून, त्यांना आता नगरसेवकांची उणीव भासू लागल्याचे चारही नगरपालिका क्षेत्रात चित्र आहे. 


हवसे-नवसे गुडघ्याला बाशिंग बांधून 
जिल्ह्यातील चार नगरपालिकामध्ये प्रशासक राज आहे. यात सर्वाधिक चर्चेची निवडणूक ही भंडारा नगरपालिकेची ठरणार आहे. जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराचा विस्तार दिवसंगणिक वाढत आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेणाऱ्या हवसे- नवस्यांचीही कमी नाही. हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.


पावणेतीन वर्षापासून प्रशासकराज 
तुमसर, साकोली, पवनी आणि भंडारा अशा चार नगरपालिका आहेत. या चारही पालिकेत प्रशासकराज असून, निवडणूक झालेली नाही. दुसरीकडे भंडारा शहर हद्दवाढीबाबतच्या निर्णयावर संभ्रमता कायम आहे. भंडाराव्यतिरिक्त पवनी, साकोली आणि तुमसर नगरपालिकेची हद्दवाढ होण्याची शक्यता कमी आहे.


विकासकामांकडे होतेय दुर्लक्ष
नगरपालिकांचा कारभार मुख्याधिकारी म्हणजे प्रशासकांच्या हाती आहे. सर्वच नगरपालिकांतून आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसल्याने नागरिकांनीही अस्वच्छता, पाणीपुरवठा, गटारी, रस्ते याबाबतच्या तक्रारी करणे सोडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र आता अनेक जण सक्रिय होताना दिसत आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. दरम्यान, अनेक इच्छुक सक्रिय झाले असून, त्यांनी या माध्यमातून आपली तयारीसुद्धा सुरू केल्याचे दिसत आहे.

Web Title: Assembly ends; When will the local government elections be held?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.