रुग्णवाहिका चालकांना एनएचएमअंतर्गत नियुक्ती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:14+5:302021-09-02T05:15:14+5:30
भंडारा : महाराष्ट्रातील संपूर्ण १०२ रुग्णवाहिका वाहनचालकांना जिल्हा परिषदअंतर्गत किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी नवजीवन ...
भंडारा : महाराष्ट्रातील संपूर्ण १०२ रुग्णवाहिका वाहनचालकांना जिल्हा परिषदअंतर्गत किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी नवजीवन रुग्णवाहिका वाहनचालक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. राधास्वामी एन. यांना पाठविण्यात आले आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास आत्मदहनाचा किंवा आत्महत्या करण्याचा इशाराही असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी निवेदनातून दिला आहे.
महाराष्ट्रात दीड दशकापासून वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व अन्य रुग्णालयात १०२ रुग्णवाहिका वाहनचालक कार्यरत आहेत. या वाहनचालकांना आठ ते नऊ हजार रुपये मानधन मिळते. मात्र त्या मोबदल्यात त्यांना २४ तास अहोरात्र काम करावे लागते. महागाईच्या काळात अशा मानधनात संसाराचा गाडा चालविणे फार कठीण झाले आहे. महाराष्ट्रातील १०२ रुग्णवाहिका वाहनचालकांना जिल्हा परिषदेमार्फत किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत नियुक्ती आदेश देण्यात यावेत, तसेच ९ जुलै २०२०च्या शासनाच्या आदेशानुसार किमान वेतन १९ हजार ९०० रुपये दरमहा द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्याशी संघटनेच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली होती. या रुग्णवाहिका वाहनचालकांना नियुक्तीचे आदेश न दिल्यास असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी शासन, प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. या आशयाचे निवेदन आरोग्य आयुक्तांसह पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.