अल्टिमेटमनंतर अभियंत्याने दिले आश्वासन, आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:07 AM2018-12-12T01:07:06+5:302018-12-12T01:08:48+5:30
देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याचे नुतनीकरण करणे व फ्लाय अॅशची तात्काळ उचल करण्यासंदर्भात शिवसेनेने संबंधित विभागाला रस्ता रोको करण्याचा अल्टिमेटम दिला होता. शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका संबंधित विभागाने घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याचे नुतनीकरण करणे व फ्लाय अॅशची तात्काळ उचल करण्यासंदर्भात शिवसेनेने संबंधित विभागाला रस्ता रोको करण्याचा अल्टिमेटम दिला होता. शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका संबंधित विभागाने घेतला. शिवसेनेचे पदाधिकारी व स्थापत्य अभियंता यांची बैठक झाली. यात लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.
तुमसर-रामटेक राज्य मार्ग दोन्ही साखळी क्रमांक १३५ मधील तुमसर उड्डाणपूलाच्या पोच मार्गाचे नुतणीकरण करण्याचे काम विशेष दुरूस्ती कार्यक्रम २०१८ अंतर्गत मंजूर करण्यात आले असून शासन नियमावलीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांचे निर्देशानुसार नव्याने निविदा बोलविण्याची योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. मुळ कंत्राटदाराकडून सेवा रस्त्यावरील खड्डे खडी व डांबरीकरण करून बुजविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फ्लाय अॅशची उचल सुरू असून शिल्लक फ्लाय अॅशही उचल करण्याचे आश्वासन शाखा अभियंता बी.आर. पिपरेवार यांनी बैठकीत दिले तथा लिखित पत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तुमसर पोलिसांनी पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती.
देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्ग खड्डेमय तथा फ्लाय अॅशमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोक्या संदर्भात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला मेल केला. मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेवून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सदर प्रमाणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिल्याचा मेल शिवसेना पदाधिकाºयांना पाठविला आहे. यामुळे बांधकाम विभागात खळबळ माजली आहे. बैठकीत पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, शिवसेना विधानसभा प्रुख शेखर कोतपल्लीवार, दिनेश पांडे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभूवनकर, गुड्डू डहरवाल, किसन सोनवाने, किशोर यादव आदी उपस्थित होते. तहसील महसूल प्रशासनाला स्मरण पत्र दिल्यानंतरही त्यांनी गंभीरतेने विषय घेतला नाही.