बिल्डर ते खासदार पदापर्यंतचा अचंबित करणारा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:55 AM2019-05-25T00:55:50+5:302019-05-25T00:56:50+5:30
अत्यंत कमी काळात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात आणि नशिबाची तेवढीच साथ मिळाल्याने लोकशाहीच्या मंदिरात जाण्याची संधी लाभलेले नाव म्हणजे सुनील बाबुराव मेंढे. बिल्डर ते खासदार असा प्रवासही तेवढाच अचंबित करणारा आहे. अत्यंत मनमिळावू व मृदुभाषी असलेले सुनील मेंढे यांची गत तीन वर्षांची राजकीय कारकीर्द भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अत्यंत कमी काळात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात आणि नशिबाची तेवढीच साथ मिळाल्याने लोकशाहीच्या मंदिरात जाण्याची संधी लाभलेले नाव म्हणजे सुनील बाबुराव मेंढे. बिल्डर ते खासदार असा प्रवासही तेवढाच अचंबित करणारा आहे. अत्यंत मनमिळावू व मृदुभाषी असलेले सुनील मेंढे यांची गत तीन वर्षांची राजकीय कारकीर्द भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण ठरली आहे.
पवनी तालुक्यातील आसगाव येथे जन्मलेले सुनील मेंढे यांचे बालपण गावातच गेले. हुरहुन्नरी व विविध विषयांचा छंद जोपासणारे सुनीलरावांना बांधकामाविषयी सुरुवातीपासून मोठी आवड आहे. मोठ्या इमारती कशा काय बांधल्या जातात, यावरच त्यांचे मंथन सुरु असायचे. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात कॅरिअर घडविण्याचा मनोदय केला. सुनील मेंढे यांनी डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग ही पदविका उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. साध्या इमारतीपासून आकर्षक बंगले बांधण्याचा त्यांनी जिल्ह्यात धडाका लावला. प्रसिध्द बिल्डर ते उद्योगपती असा शिक्का ही त्यांच्या नावासोबत जोडण्यात आला.
बालपणापासूनच राष्टÑीय स्वयंसेवक संघाशी जवळून संबंध असल्याने शिस्तीचे बाळकडू त्यांना मिळाले. याचाच फायदा त्यांना राजकारणातही चांगला झाला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या मेंढे यांनी थेट भंडाराच्या नगराध्यक्षपदी विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याचा इतिहासही रचला. अवघ्या अडीच वर्षातच विकास कामांना प्राधान्य दिल्याने एक प्रामाणिक व विश्वासू नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. भाजपने त्यांना खासदारकीची उमेदवारी देऊ केली. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू म्हणूनही सुनील मेंढे यांना ओळखले जाते. बिल्डर ते खासदार पदापर्यंतच्या प्रवासात कुटुंबातील मंडळींसह, नातेवाईक, भाजपच्या राजकीय दिग्गजांसह पदाधिकारी व मित्रपक्षांचे पाठबळ त्यांना लाभले आहे.
बांधकाम व्यवसायाचा प्रचंड अनुभव
शहरात सुनील मेंढे हे नाव बांधकाम व्यवसायीक म्हणून चांगलेच नावाजलेले आहे. रोजगार निर्माण तथा अन्य क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबळ विचारधारा जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे जीवनही तेवढेच शालिन आहे. क्रीडा व पर्यटनात त्यांना आवड आहे. तीन वर्षांच्या राजकीय प्रवासात थेट नगराध्यक्ष ते खासदारपर्यंतच्या प्रवासात त्यांनी विविध विषयात व वेळप्रसंगी कडू अनुभवही आत्मसात केले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले आहे. भंडारा शहरातील खात रोड परिसरात सनीज् स्प्रिंग डेल ही सीबीएसईस्तरीय शाळेचे नाव लौकीक आहे. अत्यंत शिस्तप्रिय जीवन जगणाऱ्या सुनिल मेंढे यांना सामाजिक क्षेत्रातही कार्य करण्याची प्रचंड आवड आहे. हीच आवड त्यांना खासदारपदापर्यंत आणण्यात कारणीभूत ठरली.