एटीएम लुटणारे जेरबंद; भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 04:07 PM2019-09-07T16:07:26+5:302019-09-07T16:07:48+5:30
लाखांदूर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम लुटणाऱ्या चार जणांना शनिवारी पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले. सर्व आरोपी हरियाणातील आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: लाखांदूर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम लुटणाऱ्या चार जणांना शनिवारी पोलिसांनी रंगेहात जेरबंद केले. सर्व आरोपी हरियाणातील आहेत.
नरेंद्र राजेंद्र कुमार (३०), प्रवीण धरमालसिंग कुमार (२१), राजेश जिलेरसिंग राजपुत (३१) व दिलबागसिंग विशालसिंग सर्व रा. हिस्सार (हरियाणा) अशी आरोपींची नावे आहेत.
एक महिन्यापूर्वी पवनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात अशा प्रकारची चोरी केली होती. तेथील पोलिस स्टेशनला त्यावेळी तक्रार दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू होता. पवनीनंतर याच परिसरातील बऱ्याच ठिकाणी अश्या प्रकारच्या चोरीची शक्यता पोलिसांना वाटत होती. अखेर लाखांदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हे चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले.
सदर चोरटे एखाद्या एटीएमधारक ग्राहकाच्या पाठोपाठ एटीएम मशीन रूममध्ये प्रवेश करतात. त्या व्यक्तीस कुठे अडचण येत असेल तर द्या मी सोडवून देतो अशा प्रकारचे वक्तव्य करतात. एकदा का त्यांच्या हाती एटीएम गेला की तो एटीएम त्यांच्याच दुसऱ्या साथीदाराला हस्तांतरित केला जातो. ग्राहकाने डायल केलेल्या पीन नंबरकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते. नंतर तो पीन त्याच्या दुसऱ्या साथीदाराला सांगितला जातो. अशाप्रकारे एटीएमधारक व्यक्तीच्या अकाउंटमधील पैसा ही टोळी आपल्या खात्यात हस्तांतरित करीत असते.
लाखांदूर पोलिसांनी या कारवाईत त्यांच्याकडून एक फॉर्च्युनर गाडी, 10 एटीएम कार्ड, 4 मोबाइल व एक स्वाईप मशीन हस्तगत केली आहे. सदर कारवाई लाखांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोहर कोरेटी पीआय कुरसंगे मेजर किसन मडावी पोलीस शिपाई बुरडे ड्रायव्हर भूपेश बावनकुळे यांनी केली. अधिक तपास पवनी पोलिस स्टेशनची टीम करीत आहे.