शहरातील एटीएम ठरू शकतात कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या १८८४ झाली आहे. बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे शासन निर्देश असले तरी या उपाययोजनांकडे बँकांचा विसर दिसून येतो. एटीएमच्या की पॅडवर दररोज शेकडो लोकांचा स्पर्श होतो.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी शासन प्रशासनाने नियमावली घालून दिली आहे. या नियमावलीचे बँकांमध्ये पालन केले जात आहे. मात्र याच बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचा विसर पडला आहे. भंडारा शहरात जवळपास ३५ ते ४० एटीएम आहेत. यातील काही एटीएम केंद्रांवर सुरक्षा गार्ड वगळता बहुसंख्य एटीएममध्ये सुरक्षा गार्डाची व्यवस्था नाही. तर कोरोनाविषयी कुठलीही उपाययोजना केलेली दिसत नाही.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ३३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून बाधितांची एकूण संख्या १८८४ झाली आहे. बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे शासन निर्देश असले तरी या उपाययोजनांकडे बँकांचा विसर दिसून येतो. एटीएमच्या की पॅडवर दररोज शेकडो लोकांचा स्पर्श होतो. शनिवारी शहरातील विविध बँकांच्या एटीएमची पाहणी केली असता एकाही एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याचा व सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनलॉकमुळे बाजारपेठेतील गर्दीही वाढत आहे. या गर्दीमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची भीती व्यक्त केली जाते. बँकांचे एटीएम हे कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्ह्यात १३० एटीएम आहेत. एटीएमच्या की पॅडला दररोज शेकडो लोकांचा स्पर्श होतो. हे की पॅड प्रत्येक व्यवहारानंतर सॅनिटाईझ होणे आवश्यक आहे. किंवा किमान ग्राहकांनी सॅनिटायझर लावून की पॅडचा वापर करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एकाही एटीएमवर अशी दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून आले.येथे फिजीकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. सार्वजनिक व्यवहार सुरु करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनाजाहीर केली. सुरुवातीला पोलीस, नगरपरिषद व प्रशासनाने अनेक नागरिकांवर दंड ठोठावला. मात्र एटीएम संदर्भात आता कुठेच कारवाई होताना दिसत नाही.
सूचनांकडे दुर्लक्ष
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो. सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. मात्र कोणत्याही एटीएममध्ये हे साहित्य दिसून आले नाही.
एटीएममध्ये सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. तेथे सॅनिटायझर ठेवणे गरजेचे आहे. एटीएममध्ये प्रवेश करताना मास्क अनिवार्य आहे. जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात उपाययोजना सुचविल्या आहेत. लवकरच सर्व बँकांना निर्देश देणार आहे.
-अशोक कुंभावार,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक भंडारा