भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह तिघांविरूद्ध ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:25 PM2022-05-13T12:25:21+5:302022-05-13T12:26:10+5:30
एका महिला जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तीन सदस्यांवर ॲट्रॉसिटी, विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवरून सभागृहात झालेल्या धक्काबुक्की व मारहाण प्रकरणात दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध भंडारा ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिला जिल्हा परिषद सदस्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तीन सदस्यांवर ॲट्रॉसिटी, विनयभंग व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक १० मे रोजी पार पडली. सभेला प्रारंभ होताच काँग्रेस, भाजप व भाजपच्या फुटीर गटातील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपच्या दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्याच दिवशी दोन्ही गटातील सदस्यांनी भंडारा ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. यात बुधवारी रात्री जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्याच्या तक्रारीवरून नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप सोमाजी ताले (रा.गर्रा ता. तुमसर), आंधळगाव गटाचे सदस्य उमेश भास्कर पाटील व तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले यांच्याविरुद्ध विनयभंगासह मारहाण, धक्काबुक्की तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिला सदस्याला संदीप ताले, उमेश पाटील व नंदू रहांगडाले यांनी जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत विनयभंग केला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले, अशी लेखी तक्रार महिला सदस्याने दिली.
दुसऱ्या गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले यांनी दिलेल्या तक्रारीत, भीलेवाडा गटाचे विनोद बांते, भागडीचे प्रियंक बोरकर, गणेश निरगुडे व माहेश्वरी नेवारे यांच्याविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात चारही जणांनी संदीप ताले यांना उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागे घ्यावा, असे सांगितले. यावर ताले यांनी मी अर्ज मागे घेणार नाही, असे म्हटल्यावर चारही जणांनी संगनमत करून ताले यांना शिवीगाळ केली. तसेच सदस्य बंडू बनकर, ध्रृपताबाई मेहर व ताले यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या कुटुंबीयांना संपवून टाकण्याची धमकी दिली, असे या तक्रारीत म्हटले आहे. यावरून भंडारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राजकीय वातावरण तापणार
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन एक दिवस होत नाही तोच प्रकरण पोलिसात गेले?. सभागृहात मारहाण झाली. दोन वर्षानंतर सत्ता स्थापन झाली. मात्र आता जिल्हा परिषदेचे सभागृह राजकीय आखाडा तर होणार नाही ना!, अशी शंका व्यक्त होत आहे.