व्हाॅट्सॲप ग्रुपने केला घात; 22 रेती तस्करांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 11:52 PM2022-10-28T23:52:52+5:302022-10-28T23:53:57+5:30

पथक कारवाईसाठी आल्याची माहिती ट्रॅक्टरचालकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती दिली. सिंघम मॅडम व आरपार काम या नावाने  असलेल्या ग्रुपमधील २२ रेती तस्करांना पळून जाण्यासाठी ही माहिती प्रसारित केली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी तलाठी ओमप्रकाश भुरे यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दिली.

Attack by WhatsApp group; 22 Offense against sand smugglers | व्हाॅट्सॲप ग्रुपने केला घात; 22 रेती तस्करांवर गुन्हा

व्हाॅट्सॲप ग्रुपने केला घात; 22 रेती तस्करांवर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेती चोरी करणाऱ्या  टोळीने तुमसर उपविभागीय  अधिकाऱ्यांच्या वाहनाचे लोकेशन व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर केल्याप्रकरणी रेती तस्कारांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमधील २२ जाणांवर तुमसर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी याप्रकरणी दोघांना तुमसर पोलिसांनी अटक केली आहे.   
तुमसर तालुक्यात एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही; परंतु दररोज मोठ्या प्रमाणात येथील नदी घाटातून रेतीची चोरी करणे सुरू आहे. रेती चोरी करून वाहतुकीदरम्यान कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती रेती तस्कारांना देण्यासाठी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाला कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. 
तुमसरच्या उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी गुरुवारी रात्री पोलीस व महसूल पथकासह तामसवाडी ते डोंगरला मार्गावर गस्त घालत होते. रात्री ८.३० वाजता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने पथक पाहून ट्राॅलीतील रेती रस्त्यावर खाली केली. त्याचवेळी पथक कारवाईसाठी आल्याची माहिती ट्रॅक्टरचालकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती दिली. 
सिंघम मॅडम व आरपार काम या नावाने  असलेल्या ग्रुपमधील २२ रेती तस्करांना पळून जाण्यासाठी ही माहिती प्रसारित केली. हा प्रकार उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्या निदर्शनास आला. त्यावरून त्यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी तलाठी ओमप्रकाश भुरे यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ट्रॅक्टर चालक-मालक श्याम रतनलाल पटले याच्यासह ग्रुपमधील २२ रेती तस्करांवर भादंवि ३७९, १०९, १२०(ब), २०१, १८६ कलमांसह जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन कलम ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदविला. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीपुडी रस्मीताराव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर तपास करीत आहेत. 
शुक्रवारी महसूल प्रशासन व पोलिसांनी तामसवाडी रेती घाटावर जाऊन पंचनामा केला. येथे रेती तस्कराने रेतीची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याचे आढळले. यामुळे रेती तस्करात एकच खळबळ उडाली असून ग्रुपच्या सदस्यावर गुन्हा नोंदविण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई मानली जात आहे. शुक्रवारी दिवसभर मोबाईल नंबरवरून रेती तस्करांची ओळख करण्याचे काम सुरू होते. उर्वरित २० आरोपींना लवकरच जेरबंद केले जाणार आहे.

रेती तस्कर भूमिगत
- गुरुवारी रात्री तुमसर ठाण्यात २२ रेती तस्करांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक रेती तस्कर भूमिगत झाले आहे. काहींनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रेतीतस्करांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतल्याची माहिती आहे. रेती तस्कर भूमीगत झाले असून त्यांचे मोबाईलही बंद झाले आहे. शुक्रवारी रेतीघाटावर शुकशुकाट होता.

अवैध वाहतूकदारांचाही व्हाॅट्स ॲप ग्रुप
- रेती तस्करीप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचांही व्हाॅट्स ॲप ग्रुप असून त्यावर पोलीस व आरटीओची माहिती प्रसारित केली जाते, अशी माहिती आहे; परंतु अवैध वाहतूकदारांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.

एसडीओ-तहसील कार्यालयापुढे तस्करांचा खबऱ्या

- रेती चोरी व वाहतूक दरम्यान रेती तस्करांनी व्हाॅट्स ॲप ग्रुप तयार केले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. रेती तस्करी रोखण्यातील अपयशासाठी व्हाॅट्स ॲप ग्रुप एक महत्त्वाचे कारण असल्याचे आता समोर येत आहे. उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाबाहेर रेती तस्कराचा खबऱ्या उभा राहतो. अधिकारी कुठे धाड टाकण्यासाठी जाणार याची माहिती व्हॉट्स ॲपच्या ग्रुपवरून तस्करांना मिळत होती. तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचेही लोकेशनही रेती तस्कर एकमेकांना देत होते, अशी माहिती आहे. उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी तुमसर येथे रूजू झाल्यानंतर रेती चोरी व वाहतुकीची माहिती गोळा केली होती. तस्करीवर आळा घालण्यासाठी त्यांनी नवनवीन क्लुप्त्या शोधून काढल्या होत्या. अखेर त्यांना गुरुवारी यात यश आले. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title: Attack by WhatsApp group; 22 Offense against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.