प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यावर हल्ला; तरुणीच्या दोन भावांसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 04:20 PM2022-07-27T16:20:56+5:302022-07-27T16:21:23+5:30
आकोट येथील घटना, हल्ल्यात तरुणाचे वडीलही जखमी
भंडारा : प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला तरुणीच्या माहेरच्यांनी करण्याची घटना पवनी तालुक्यातील आकोट येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. लाठीकाठीने मारहाण केल्याने तिघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तरुणीच्या दोन भाऊ, काकांसह पाच जणांविरूद्ध अड्याळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पती फिरोज धनराज तेलमासरे (२५), पत्नी पूजा फिरोज तेलमासरे (२०), वडील धनराज तेलमासरे (रा. आकोट, ता. पवनी) अशी जखमींची नावे आहेत. फिरोजचा हॉटेलचा व्यवसाय असून दोघेही आकोट येथेच आईवडिलांसह राहतात. पूजाच्या आई-वडिलांचा या विवाहाला सुरुवातीपासून विरोध असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते.
सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पूजाच्या हाताला बांगडी रुतली. त्यामुळे फिरोज तिला कोंढा येथे रुग्णालयात घेऊन जात होता. त्याचवेळी फिरोजला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार का दिली, आकोटला ये पाहून घेतो, अशी धमकी दिली. पत्नीवर उपचार करून तिला घरी सोडले आणि फिरोज हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाला. त्यावेळी रस्त्यात भोजराज तुळसकर (४०), अंकित तुळसकर (२४), हितेश तुळसकर (३०), योगेश तुळसकर (२७), प्रदीप तुळसकर (४०) आणि एका अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करून फिरोजला काठीने मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून वडील धनराज तेलमासरे तेथे आले. त्यांनाही मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी पूजालाही बेदम मारहाण करण्यात आली. तसेच फिरोजच्या काका-काकूलाही मारहाण केली. यात पत्नी-पत्नीसह वडील गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची तक्रार मध्यरात्री अड्याळ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यावरून पूजाच्या माहेरच्या पाच जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हेमराज सोरते करीत आहेत.
तिघांचीही प्रकृती गंभीर
मारहाणीत फिरोज, पूजा आणि वडील धनराज गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. प्रेम प्रकरणातून झालेल्या या जीवघेण्यात हल्ल्याने पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महिनाभरापूर्वी प्रेमविवाह
आकोट येथील फिरोज तेलमासरे या तरुणाचे गावातीलच पूजा तुळसकर या महाविद्यालयीन तरुणीवर प्रेम होते. मात्र दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी मोहाडी येथील चौंडेश्वरी मंदिरात १७ जून रोजी विवाह केला. त्यानंतर कोंढा येथील पंकज मंगल कार्यालयात स्वागत समारंभही आयोजित केला होता.