शिवसेनेचा पालिकेवर हल्लाबोल
By admin | Published: July 16, 2016 12:40 AM2016-07-16T00:40:59+5:302016-07-16T00:40:59+5:30
भंडारा : पिण्याचे स्वच्छ पाणी, वॉर्डात पक्के रस्ते, रस्त्यांची डागडूजी तथा घनकचरा व्यवस्थापनाची समस्या मार्गी लावाव्यात...
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : आठ दिवसांचा अल्टीमेटम
भंडारा : पिण्याचे स्वच्छ पाणी, वॉर्डात पक्के रस्ते, रस्त्यांची डागडूजी तथा घनकचरा व्यवस्थापनाची समस्या मार्गी लावाव्यात या मागणीला घेवून शिवसेनेने आज भंडारा नगरपालिकेवर हल्लाबोल्ल केला. यात माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात पालिका मुख्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
भंडारा शहरात पिण्याचे पाणी, स्वच्छता, अतिक्रमण, रस्त्यांची डागडूजी, नाल्यांची बांधणी यासह अन्य समस्या अजूनही कायम आहे. वारंवार सांगूनही या समस्या निकाली निघालेल्या नाही. दूषित पाण्याची समस्या ही नागरिकांचा जिवावर बेतणारी असली तरी पालिका प्रशासनाला गांभीर्य नाही. रस्ते, नाल्यांची समस्या ही सोडविली जात नाही.
जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय बांधकामाचा प्रस्ताव भंडारा शहरात विचाराधीन असतांना लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करित आहेत. तसेच भाजीपाला मार्केटसाठी अल्पशा मोबदल्यात एका खाजगी कंपनीला जलशुध्दीकरण केंद्रालगतची जागा देण्यात आली होती. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने पालकमंत्री यांनी दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम स्थगितीबाबत आदेश दिले. शहरातील बगिच्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील मागास भागात राहणाऱ्या नागरिकांना नझुलचे पट्टे देण्यात आले नाही. शहरात सौंदर्यीकरणाची कामे प्रलंबित आहेत. यासर्व समस्यांना घेवून आज सकाळी ११ वाजता पालिकेवर शिवसेनेने हल्लाबोल्ल केला. यात समस्येच्या निवारण्यात आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले, उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अनिल गायधने, नितीन साकुरे, ललित बोंद्रे, यशवंत सोनकुसरे, विशाल लांजेवार, आकाश जनबंधु, कैलास तांडेकर, पंकज दहिकर, मयुर लांजेवार, बाबा तांडेकर, सुधिर उरकुडे, दिपक डोकरीमारे, ईश्वर टाले, जग्गू हजारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)