रोहा घाटावर तलाठी व कोतवालावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:43+5:30
महसूल विभागाने रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी तपासणी चौकी लावण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावरही बैठे पथकाची चौकी लावण्यात आली. बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयातील तलाठी पराग जयकांत तितीरमारे, अमोल शरद पोरेड्डीवार, कोतवाल हेमंतकुमार हरिशचंद्र गराडे, उमाशंकर फकीरा पडोळे आणि होमगार्ड खुशाल झेलकर कर्तव्यावर होते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी/आंधळगाव : रेती तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व कोतवालावर हल्ला करुन बेदम मारहाण करण्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा येथे घडली. रेती टिप्परच्या हायड्रोलिक ट्रॉलीने तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रोहा येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रेती तस्करांविरुध्द मात्र कोणतीही कारवाई आली नाही. तुमसरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याची शाही वाळत नाही तोच मोहाडी तालुक्यात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाने रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. विविध ठिकाणी तपासणी चौकी लावण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावरही बैठे पथकाची चौकी लावण्यात आली. बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयातील तलाठी पराग जयकांत तितीरमारे, अमोल शरद पोरेड्डीवार, कोतवाल हेमंतकुमार हरिशचंद्र गराडे, उमाशंकर फकीरा पडोळे आणि होमगार्ड खुशाल झेलकर कर्तव्यावर होते. सायंकाळच्या सुमारास बेटाळा कडून रेती भरुन आलेल्या दोन टिप्परची चौकशी केले. त्यावेळी रेती वाहतूकीची रॉयल्टी नसल्याचे लक्षात आले. दोन्ही टिप्पर चालकांना टिप्पर मोहाडी तहसील कार्यालयात घेऊन जाण्याची बैठा तलाठ्याने दिली. या पथकातील दोघांना टिप्परमध्ये बसविण्यात आले. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या युवकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना टिप्पर का अडविला असे म्हणत चालकांना रेती खाली करण्यास सांगितले. त्यावरुन चालकांनी हायड्रॉलीक ट्रॉली उचलून रेती खाली करीत असतांना टिप्पर पळविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या ट्रॉलीमुळे रोहा गावाला वीज पुरवठा करणाºया तारा तुटून मोठा आवाज झाला. गावातील लोक धाव या बैठा चौकीकडे आले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या लाठ्या आणि लाथाबुक्यानी कोतवालांना मारहाण केली. या सर्व गोंधळात टिप्पर चालक मात्र तेथून वाहनासह पसार झाले. दरम्यान तलाठी पराग तितीरमारे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन आरोपी प्र्रकाश पडोळे, आकाश पडोळे, हेमराज पडोळे, धनराज पडोळे, गौरीशंकर पवारे, उमाशंकर पवारे, वासुदवे पडोळे, अंकुश अहिर यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहीस्तोवर कुणालाही अटक करण्यात आली नाही.
कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
मोहाडी तालुक्यातील रोहा येथे झालेल्या हल्ला प्रकरणाचा धस्का महसूल पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी घेतला आहे. मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांना निवेदन देवून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही. तोपर्यंत तालुक्यातील रेतीघाटांवर बैठे पथक कर्तव्य बजावणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन विदर्भ पटवारी संघाची तुमसर उपशाखा आणि मोहाडी तालुका कोतवाल संयुक्त संघर्षसमितीने दिले आहे. या पथकावरील हल्ल्याचा विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने निषेधही करण्यात आला आहे.