व्यापारी संकुलावर हातोडा चालविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:46+5:30
येथील मुख्य बाजारात गणेश भवन व्यापारी संकूल आहे. या संकुलात दहा व्यवसायीक गत ४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी इमारतीच्या ट्रस्टींनी दुकानदारांना पूर्व सूचना न देता इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे केले. बुधवारी अचानक इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराची माणसे साहित्यासह गणेश भवनात दाखल झाली. त्यावेळी दुकानदारांनी इमारत पाडण्याच्या पत्राची मागणी केली. कंत्राटदाराने पत्र दाखविले नाही नंतर ते सर्व साहित्य घेवून निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भाडेकरु दुकानदारांना कोणतीच पूर्व सूचना न देता येथील बोसनगरातील गणेश भवन या व्यापारी संकुलावर भर पावसाळ्यात हातोडा चालविण्याचा प्रयत्न झाला. मात्र येथील व्यापाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत हा प्रयत्न हाणून पाडला. गुरुवारी व्यापाऱ्यांनी निदर्शने करुन तहसीलदार, पोलीस आणि नगरपरिषदेकडे तक्रार दिली आहे.
येथील मुख्य बाजारात गणेश भवन व्यापारी संकूल आहे. या संकुलात दहा व्यवसायीक गत ४० वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. परंतु आठ महिन्यापूर्वी इमारतीच्या ट्रस्टींनी दुकानदारांना पूर्व सूचना न देता इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे केले. बुधवारी अचानक इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराची माणसे साहित्यासह गणेश भवनात दाखल झाली. त्यावेळी दुकानदारांनी इमारत पाडण्याच्या पत्राची मागणी केली. कंत्राटदाराने पत्र दाखविले नाही नंतर ते सर्व साहित्य घेवून निघून गेले. व्यापारी संकुल खरेदी करणाऱ्यांपैकी एक खरेदीदार दुकानदारांना जागा रिकामी करण्याचा सारखा तगादा लावत आहे. गणेश भवन संघर्ष समिती हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आक्रमक झाली आहे. गुरुवारी समितीचे प्रमुख अमित मेश्राम, जगदिश त्रिभुवनकार यांनी निदर्शने केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भोयर, प्रशांत कुरंजेकर, महेश डोहळे, नारायण संभवानी, भरत सोनकर, शंकर भोंगाडे, मोहन दुपारे, प्रेमचंद शर्मा यांनी केली आहे. प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याची मागणी आहे.
पावसाळ्यात जायचे कुठे?
ऐन पावसाळ्यात गणेश भवन व्यापार संकुल भुईसपाट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पावसाळा अशा स्थितीत जायचे कुठे असा प्रश्न येथील व्यापाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुकानदारांना जबरदस्तीने कुणी बाहेर काढत असेल तर त्याला शिवसेना प्रतिउत्तर देईल. असे शिवसेना संपर्क प्रमुख नीलेश धुमाळ यांनी सांगितले. आता काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.
गणेश भवन व्यापारी संकुल भूईसपाट करण्याची परवानगी आपण दिली नाही, याबाबत माहिती नाही.
-विजय देशमुख
मुख्याधिकारी तुमसर