ऑर्डिनन्स फॅक्टरीतून स्फोटक उत्पादनाचे साचे चोरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:45 PM2024-10-17T13:45:58+5:302024-10-17T13:46:30+5:30

सुरक्षा रक्षकांची सतर्कता: दोन कंत्राटी कामगारांना अटक

Attempt to steal molds for making explosives from an ordnance factory | ऑर्डिनन्स फॅक्टरीतून स्फोटक उत्पादनाचे साचे चोरण्याचा प्रयत्न

Attempt to steal molds for making explosives from an ordnance factory

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
स्फोटके तयार करण्यासाठी वापरल्या जाणान्या १४ साच्यांची (डाय) चोरी करताना दोन कंत्राटी कामगारांना मंगळवारी रात्री सुरक्षारक्षकांनी पकडले. ही घटना भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये घडली, तपासादरम्यान त्यांच्याकडून १४ साचे जप्त करण्यात आले आहेत. या चोरीमागील त्यांचा उद्देश काय होता, हा आता तपासाचा भाग आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा येथील कॉर्पोरटीकरणानंतर उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा हा स्फोटक सामग्री बनवणारा कारखाना आहे. येथे देशाच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे अनेक प्रकारचे स्फोटक साहित्य तयार केले जाते. कारखान्यातील देखभाल व देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी पाळीत कामावर येणाऱ्या कामगारांची तपासणी सुरक्षारक्षकांकडून केली जाते. 


दरम्यान, १० ऑक्टोबरच्या संध्याकाळी, नियमित तपासणीदरम्यान, सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराच्या हाताखाली काम करणारा मजूर महेंद्र रामटेके (रा. कोंढी) याच्याकडून स्फोटके तयार करण्यासाठी वापरले जाणारे १४ साचे जप्त केले. 


सुरक्षा विभागाकडून कारवाईत चालढकल 
ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या प्रॉडक्शन बिल्डिंगमधून साचे चोरीच्या घटना यापूर्वीही नोंदल्या गेल्या आहेत. तक्रारीही अनेक वेळा करण्यात आल्या; मात्र सुरक्षा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची कामगार वर्गात चर्चा आहे. येथील एनडीजीबीजीओए यूनियनने लेखी पत्र देऊन कारखाना प्रशासनाकडे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी दुवे उजेडात येतील, अशी शंकाही या पत्रातून वर्तविली आहे. ठेकेदाराने बांधलेल्या अंतर्गत गोदामाची चौकशी केल्यास आणखी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे युनियनचे म्हणणे आहे.


प्रकरण दडपण्याचा प्रयत्न 
यानंतर सुरक्षा विभागाने है प्रकरण दडपून आपले हात ओले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर या घटनेची तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून महेंद्र रामटेके आणि चकोले या दोन आरोपींना १५ ऑक्टोबरच्या रात्री अटक केली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करत आहेत.
 

Web Title: Attempt to steal molds for making explosives from an ordnance factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.