पुरस्कार योजनेत घोळ करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:23 AM2021-02-22T04:23:57+5:302021-02-22T04:23:57+5:30
भंडारा : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण ...
भंडारा : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची योग्य ती चौकशी करून प्रामाणिकपणे पुरस्कार प्रक्रिया व्हावी यासाठी राज्याला निर्देश द्यावे, अशा आशयाचे पत्र खा.सुनील मेंढे यांनी केंद्रीय पंचायत राजमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पाठवले आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर लिचडे यांनी खा. सुनील मेंढे यांच्याकडे ्ेकेलेल्या तक्रारीच्या आधारे हे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या आहे. केंद्र पुरस्कृत पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तपासणीसाठी म्हणजे मानांकनासाठी राज्य शासनाचा एक चमू नांदेड येथून गावात आला होता. तपासणी झाल्यानंतर चमूकडून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुण नोंदविणे गरजेचे असते; परंतु गुण नोंदविण्याआधीच संकेतस्थळावर ग्रामपंचायतीच्या पुढे गुण नोंदविले असल्याचे दिसून आले. पुरस्कार योजनेत योग्य ग्रामपंचायतीला वगळून मर्जीतील ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे सरपंच लिचडे यांनी तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, या तक्रारीच्या आधारे खा. मेंढे यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तपासणी होण्यापूर्वीच संकेतस्थळावर ग्रामपंचायत मोहदुराच्या पुढे गुण कसे भरण्यात आले? हा गंभीर विषय असून त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या चमूला त्यात बदल करता आला नाही, असेही खा. मेंढे यांनी म्हटले आहे. हा प्रकार राष्ट्रीयस्तराच्या प्रकारात घोळ घालण्याचे संकेत देणारा आहे. राज्य शासन अपात्र पंचायतींना पुरस्कार देण्यासाठी आग्रही असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राज्य शासनाकडून होत असलेल्या या घाणेरड्या राजकारणाची स्वतः हस्तक्षेप करून चौकशी व्हावी व पुन्हा तपासणी होऊन योग्य ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाईल यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी खा.सुनील मेंढे यांनी पत्रातून केली आहे.