कडाक्याच्या थंडीत उमेदवारांची हजेरी
By admin | Published: November 10, 2016 12:49 AM2016-11-10T00:49:05+5:302016-11-10T00:49:05+5:30
भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली.
वनविभागाची भरती प्रक्रिया : तिसऱ्या दिवशी १,१७० उमेदवारांची झाली नोंद, ९७२ ठरले पात्र
भंडारा : भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली. यात ९७२ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले.
भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गडेगाव लाकूड आगारात ही भरती प्रक्रिया सोमवारपासून राबविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत दररोज २ हजार उमेदवारांची हजेरी राहण्यासंदर्भात नोकरी इच्छूक अर्ज केलेल्या उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. मात्र सर्व उमेदवार हजर होत नसल्याने उपस्थित उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेवून पुढल्या पात्रता फेरीसाठी निवड केली जात आहे.
आज बुधवारला या भरती प्रक्रियेचा तिसरा दिवस होता. यासाठी १ हजार १७० उमेदवार भरती प्रक्रियास्थळी उपस्थित होते. यात ८८८ पुरुष तर २८२ स्त्री उमेदवारांचा समावेश होता. यातील १९८ उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले. त्यात ५५ स्त्री उमेदवार तर १४३ पुरुष उमेदवारांचा समोवश आहे. ९७२ उमेदवार पात्र ठरले असून यात २२७ स्त्री उमेदवार तर ७४५ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. पहाटेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात कुठलाही अनूचित प्रकार होवू नये यासाठी वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी )