१४ ऑगस्टच्या क्रांतीने पेटविली स्वातंत्र्याची मशाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:03+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सर्वत्र स्वातंत्र्याचा यज्ञकुंड धगधगत होता. त्याचे लोण तुमसरपर्यंतही पोहचले होते. १० ऑगस्ट १९४२ रोजी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. काहींना अटक झाली तर काही भूमीगत झाले. मात्र १४ ऑगस्ट रोजी तुमसरात मोठी मिरवणूक काढली. पोलिसांनी ही मिरवणूक अडवून लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जणांना वीरमरण आले, तर शेकडो जखमी झाले. तेथूनच खऱ्या अर्थाने तुमसरात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटली. शनिवारी १४ ऑगस्ट रोजी या लढ्यातील वीर क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य केंद्र तुमसर होते. १९१८ साली दुष्काळ पडल्याने तुमसरातून परप्रांतात धान्य जात होते. त्यावेळी सत्याग्रह करण्यात आला. अनेकांना अटक झाली. तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटली. १९२३ ला झंडा सत्याग्रह सुरु झाला. त्यात मो.प. दामले, लक्ष्मण गणेश समरीत, सिहोराचे गोपीचंद पाटील यांनी यात भाग घेतला. त्यांना कारावास झाला. १९३० साली जंगल सत्याग्रहातही तुमसर आघाडीवर होते. चिंचोली येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. मात्र १४ ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारानंतर स्वातंत्र्याची मशाल आणखीनच धगधगली. १० ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ पुढाऱ्यांना पकडण्याचे वॉरंट काढले. अनेकजण भूमीगत झाले. १४ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी तुमसरात मिरवणूक काढली. हजारो नागरिक सहभागी झाले. सुरुवातीला पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर न्यायाधीश जयवंत यांनी गोळीबाराचा आदेश काढला. त्यावेळी गोळीबार करण्यात आला. त्यात श्रीराम धुर्वे, भद्दू लोंदासे, श्रीहरी फाये, पांडूरंग सोनवाल, भुवाजी बानोरे, राजाराम धुर्वे यांना वीरमरण आले. तर शेकडो कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी त्यांची अंत्ययात्रा काढण्यासही नकार दिला. मात्र म.पो. दामले व इतरांनी दिलेल्या इशाऱ्याने सर्व मृतदेह ताब्यात देण्यात आले. डोंगरलात अंत्यसंस्कार झाले.
स्वातंत्र्यवीरांच्या गौरवाचे स्मरण
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाºया शूरविरांचे तुमसर येथे स्मारक उभारण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी राष्ट्रीय शाळेला भेट दिली. त्यांच्याच हस्ते शहीद स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर पंडीत मोतीलाल नेहरु, महात्मा गांधी, महात्मा भगवान दास, पंडीत सुंदरलाल, आचार्य कृपलानी, पट्टीभीसीतारामय्या, जयप्रकाश नारायण, प्रकाश, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाळगीळ आदींनी तुमसरला भेट देऊन येथील क्रांतीकारकांचा गौरव केला. तुमसर शहरातील हे शहीद स्मारक आज तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. १४ ऑगस्ट रोजी यानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण तुमसरातील नागरिक या स्मारकापुढे नतमस्तक होतात. तुमसर शहराने स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाला तोड नाही. त्याचा अभिमान आज प्रत्येक तुमसरकरांना आहे.