मावशीने भाचीला दिले गुंगीचे औषध, बनविला आक्षेपार्ह व्हिडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 11:08 AM2022-04-05T11:08:22+5:302022-04-05T11:26:47+5:30
मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला.
साकोली (भंडारा) : चहात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करत मावशीने एका मुलाच्या साह्याने आपल्याच भाचीचे (बहीण-लेक) आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हणायला गेलं तर, मावशी ही दुसरी आईच मात्र, या प्रकाराने एका पवित्र नात्याला काळीमा फासल्या गेलीये.
पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत शोषण करण्याचा प्रकार एका वर्षापासून सुरू होता. अखेर हिम्मत करून पीडितेने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला व मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना साकोली तालुक्यातील असून पीडिता ही गोंदिया जिल्ह्यातील आहे. गोवर्धन गोविंदा बावनकुळे (२५, रा. शिवनी मोगरा, ता. लाखनी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये पीडित मुलगी व तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघीही मुक्कामी थांबल्या. त्यावेळी मावशीने पीडितेला चहा दिला व तिला वर धाब्यावर साड्या पाहण्याकरिता बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली. काही वेळानंतर मुलगी उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यावेळी तिने आपल्या मावशीला विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली.
त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला. ज्या मुलाने मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केला तो पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जायचा व तिचे शोषण करायचा. पीडित मुलीने विरोध केल्यास व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. दरम्यान, मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. त्यावेळी मावशीने मुलीला बाहेर चौकात फिरायला नेले असता हा सर्व प्रकार उघडकीला आला.
पीडितेच्या आई-वडिलांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडिता व तिच्या पालकांच्या तक्रारीवरून मुलगा व तिच्या मावशीविरोधात विविध कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे. पुढील तपास साकोली पोलीस करत आहेत.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाणे येथे मुलगा व मावशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
- जितेंद्र बोरकर, ठाणेदार, साकोली