वैनगंगेच्या पुलावर ट्रेलरने घेतला काकू-पुतण्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 09:33 PM2022-03-28T21:33:29+5:302022-03-28T21:33:59+5:30
भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला.
भंडारा : वैनगंगा नदीवरील पुलावर अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नाही. भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडला. आपघाताची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. हरभरा कापणीसाठी एकाच दुचाकीवर तिघेजण जात असताना काळाने घाला घातला.
सुशिला मुरलीधर कागदे (६०), विष्णू लक्ष्मण कागदे (४५) असे मृत काकू-पुतण्याचे नाव आहे, तर सुनीता विष्णू कागदे (३५) असे जखमीचे नाव आहे. तिघेही भंडारा तालुक्यातील मालीपार चांदोरी येथील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी तिघेही चांदोरी मालीपार येथून दुचाकीने (एमएच ३५ सी ८१८७) भंडारालगतच्या कोरंबी येथे हरभरा कापणीसाठी जात होते. एकाच दुचाकीवर तीघे जण प्रवास करीत असताना वैनगंगा नदीच्या पुलावर मागून आलेल्या ट्रेलरने (केए ०१ एजी ८७६१) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, तिघेही चाकाखाली आले. सुशिला कागदे यांचा जागीच मृत्यू झाला. विष्णू आणि सुनीता गंभीर जखमी झाले.
जखमींना तत्काळ भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही नागपूर येथे रवाना करण्यात आले. विष्णूचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुनीतावर उपचार सुरू आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. विष्णूच्या मागे दोन मुली, दोन मुले आहे. सुशिलाच्या मागे पती व एक मुलगा आहे. अपघातानंतर जिल्हा वाहतूक शाखा, कारधा पोलिसांनी धाव घेतली.
पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षा उपायांचा अभाव
राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीवर भंडारानजीकचा पूल दुपदरी आहे. साधारणत: एक किलोमीटर लांबीचा हा पूल असून पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाही. गोसे प्रकल्पाचे पाणी वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैनगंगेचा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे या मोठ्या पुलावरूनच सर्व वाहतूक होत आहे. भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. त्यात एखाद्या वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यास समोरील दुचाकीस्वार गोंधळून जातो आणि अपघात होतात. अशाच ओव्हरटेकच्या प्रयत्नात गोंधळून जाऊन काकू आणि पुतण्याचा बळी गेला.