अवैध उत्खननाला अधिकाऱ्यांचाच छुपा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:09+5:30
तालुक्यात आष्टी ते ढोरवाडापर्यंत असलेल्या वैनगंगेच्या पात्रात आजही दररोज कोणताही लिलाव नसताना ३०० ते ४०० ट्रक अवैधपणे रेती उपसा सुरु आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या सहकार्याने तालुक्यात रेतीचोरी सुरु आहे. ही बाब तालुक्यातील शासकीय यंत्रणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रेती उत्खननातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात मॅग्निज, मुरुम, रेती, डोलामाईट खनिज मुबलक प्रमाणात आढळत असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे. खनिज संपत्तीचे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना शासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही.
भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर तालुक्यात सर्वाधिक खनिज संपत्तीचे साठे आहेत. मॅग्निज वगळता रेती, मुरुम व इतर खनिजे कमी जास्त प्रमाणात सर्वत्र आढळतात. त्यामुळे तालुक्यामध्ये अवैध उत्खननाचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक तुमसर तालुक्यात दिसून येते. तालुक्यात आष्टी ते ढोरवाडापर्यंत असलेल्या वैनगंगेच्या पात्रात आजही दररोज कोणताही लिलाव नसताना ३०० ते ४०० ट्रक अवैधपणे रेती उपसा सुरु आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या सहकार्याने तालुक्यात रेतीचोरी सुरु आहे. ही बाब तालुक्यातील शासकीय यंत्रणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रेती उत्खननातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यात अवैध उत्खनन भर दिवसा अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर होत असताना राजकीय दबावापोटी तर अधिकारी कारवाई करण्यासाठी घाबरत तर नाहीत ना असा सवाल विचारला जात आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून पैसे मिळत असल्याने गत काही दिवसांपासून तालुक्यात उत्खनन सुरु आहे. अनेक ठिकाणी मुरुम नाही त्या ठिकाणची परवानगी देऊन अन्यत्र मुरुम उत्खनन करण्याचा सपाटा अनेक मुरुम उत्खनन तस्करांकडून सुरु आहे. याबाबत तहसीलदारांना माहिती दिली असता कारवाई करण्याऐवजी कंत्राटदाराकडे नाव जात असल्याने अनेकदा गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून सर्वसामान्यांना दमदाटी केली जाते. असाच प्रकार शनिवारी तालुक्यातील देव्हाडी परसवाडा परिसरात शेतशिवारात एका ठिकाणी जेसीबीने मुरुमाचे उत्खनन सुरु असताना अनुभवाला आला. तुमसरच्या तहसीलदारांना फोनवरून माहिती दिल्यानंतर मी माहिती घेतो असे सांगितल्यानंतर उत्खनन करणाऱ्या व्यक्तींनी काही वेळातच दमदाटी केल्याने कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हितसंबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धमकविले जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोळेझाक होतेय
तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मॅग्निज, रेती तसेच मुरुमाचे अवैध उत्खनन सुरु आहे. परंतु अधिकारी वैयक्तिक स्वार्थापोटी अवैध उत्खननाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. अनेकदा कारवाई केली असता राजकीय हेवेदाव्यातून अधिकाऱ्यांवरच अनेकदा दबाव आणला जातो. तालुक्यात वाढलेल्या अवैध उत्खननाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. गत काही दिवसांपासून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तुमसर तालुक्यातील अवैध उत्खननावर आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.