नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करा!
By admin | Published: April 8, 2017 12:27 AM2017-04-08T00:27:37+5:302017-04-08T00:27:37+5:30
नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करुन आरोग्यदायी जीवन जगणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी : जागतिक आरोग्य दिन साजरा
भंडारा : नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करुन आरोग्यदायी जीवन जगणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव डॉ. लोकनाथ गिऱ्हेपुंजे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उईके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुनमचंद्र बावनकर, डॉ. वंदना कुकडे, डॉ. चंद्रमोहन गुप्ता, जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नाकर बांडेबुचे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोगय कार्यक्रम, आयएमए, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आणि आरोग्य विभाग यांचे संयुक्त समन्वयातून या अभिनव कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.
डॉ. धकाते यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. बांडेबुचे यांनी जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य "चला बोलू या, नैराश्य टाळू" यावर विचार व्यक्त केले. डॉ. गुप्ता यांनी नैराश्यावर पंचसुत्र सांगितले. डॉ. परांग डहाके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त आयोजित पोस्टर स्पधेर्तील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले. तर आभार जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी भगवान मस्के यांनी मानले. या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी, नर्सिग स्कुल विद्यार्थींनी व पदाधिकारी तसेच रुगणालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)