शवविच्छेदनातून वाघांसह अनेक वन्यजीवांच्या मृत्यूचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 05:00 AM2022-02-10T05:00:00+5:302022-02-10T05:01:03+5:30

एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे आव्हानात्मक काम असते. हे काम गेल्या २२ वर्षांपासून डाॅ.गुणवंत भडके करीत आहेत. मृत जनावरांच्या शारीरिक बदलावरुन मृत्यूचे कारण शोधले जाते. साप चावल्यास जखमेजवळ सूज येते. शरीरातील छिद्रातून रक्त बाहेर पडते. वीज करंट लागल्यास शरीरावर जळाल्याच्या खुणा असतात. त्वचा आतून पोळते. जीभ दातात फसलेली असते. नागपुड्यातून रक्त बाहेर पडते.

Autopsy revealed the death of many wildlife, including tigers | शवविच्छेदनातून वाघांसह अनेक वन्यजीवांच्या मृत्यूचा छडा

शवविच्छेदनातून वाघांसह अनेक वन्यजीवांच्या मृत्यूचा छडा

Next

युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : वन आणि वन्यजीवांनी भंडारा जिल्हा समृद्ध आहे. मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे; मात्र शिकारी व अन्य कारणामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचे कारण शोधून शिकाऱ्यांना अटक करण्याचे मोठे दिव्य वनविभागापुढे असते. अशा अनेक प्रकरणांत लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ.गुणवंत भडके वनविभागाच्या मदतीला धावून येतात.  शवविच्छेदनातील तंत्रशुद्ध निदानामुळे शिकाऱ्यांना अटक करणे वनविभागाला सहज शक्य झाले. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात भंडारा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. 
एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाला की त्याच्या मृत्यूचे कारण शोधणे आव्हानात्मक काम असते. हे काम गेल्या २२ वर्षांपासून डाॅ.गुणवंत भडके करीत आहेत. मृत जनावरांच्या शारीरिक बदलावरुन मृत्यूचे कारण शोधले जाते. साप चावल्यास जखमेजवळ सूज येते. शरीरातील छिद्रातून रक्त बाहेर पडते. वीज करंट लागल्यास शरीरावर जळाल्याच्या खुणा असतात. त्वचा आतून पोळते. जीभ दातात फसलेली असते. नागपुड्यातून रक्त बाहेर पडते. विषबाधा झाल्यास तोंड उघडे असते. फेसमिश्रीत रक्तस्त्राव सुरु असतो. डोळे बाहेर असतात. शरीरातून बाहेर पडणारी विष्ठाही पातळ असते. अशा अनेक लक्षणांवरून मृत्यूचे निदान केले जाते. त्यात डाॅ.गुणवंत भडके तज्ज्ञ मानले जातात. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही वन्यजीवाचा मृत्यू झाला की डॉ. भडके तेथे पोहोचतात. त्यांनी केलेल्या मृत्यू कारणांच्या निदानावरून वनविभाग तपासाची दिशा निश्चित करतात. त्यांच्या या कार्याचा शासनाच्या वतीने गौरवही करण्यात आला. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार दिला.

..अन् जमाव आला होता घरावर चालून
- डाॅ. गुणवंत भडके २००६-०७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत होते. त्यावेळी तळोधी परिसरात एका नरभक्षक बिबट्याने १७ जणांचा प्राण घेतला होता. या वाघाला ठार मारण्याची परवानगी मिळाली आणि त्याला ठारही मारण्यात आले. या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डाॅ. भडके यांनी हा नरभक्षक वाघ नसल्याचे सांगितले; परंतु त्यांच्यावर कुणी विश्वासही ठेवत नव्हते. माध्यमातील बातम्यांनी खळबळ उडाली. वनअधिकारी नाक मुरडायचे. शेकडो लोकांचा जमाव घरावर चालूनही आला होता. मात्र, त्यानंतर आठच दिवसांत त्या नरभक्षक वाघाने पुन्हा एका मुलीचा बळी घेतला आणि डाॅ. भडके यांच्या अंदाजाला खरे ठरविले.

१३ वाघ व १०० बिबट्यांचे शवविच्छेदन 
- पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके यांचे वनविभागात आदराने नाव घेतले जाते. त्यांनी आपल्या २२ वर्षांच्या कार्यकाळात १३ वाघ, १०० बिबटे, ५० हरीण, १५ रानगवे, १२ नीलगायी, ११ अस्वलांचे शवविच्छेदन केले. दोन आठवड्यांपूर्वी भंडारा येथील पलाडी येथे मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा बी या वाघाचे शवविच्छेदनही त्यांनीच केले.

विविध पुरस्कार
- डाॅ.गुणवंत भडके यांना २२ वर्षाच्या कार्यकाळात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विभागीय स्तरावरील उत्कृष्ट पशुधन विकास अधिकारी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. २०१६-१७ मध्ये प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर मानेगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला आयएसओ मानांकन मिळवून दिले.

 

Web Title: Autopsy revealed the death of many wildlife, including tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.