आॅटोरिक्षा चालकांचा मोर्चा
By admin | Published: January 24, 2017 12:34 AM2017-01-24T00:34:55+5:302017-01-24T00:34:55+5:30
सरकारकडून दिवसेंदिवस आॅटो रिक्षा चालकांवर अत्याचार वाढत आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन : परवाना आॅटो चालकांवर होणारा अत्याचार थांबवा!
भंडारा : सरकारकडून दिवसेंदिवस आॅटो रिक्षा चालकांवर अत्याचार वाढत आहे. त्यामुळे आॅटो चालकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी आॅटो रिक्षा चालक मालक असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.
सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमानुसार भोंगळ कारभारामुळे आॅटो चालकांचा व्यवसाय मोडकळीस आणण्याचा व ओला ओबेरा केब ई-रिक्षा सारख्या वाहनांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यामुळे आॅटो चालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. संकट त्वरीत थांबविण्यात येऊन जुनीच भाडे कायम ठेवण्यात यावे, केलेली दरवाढ मागे घेण्यात यावे, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसारच शुल्क लागू करण्यात यावा, ई-रिक्षा ओला ओबेरा केब सारख्या वाहनांना परवानगी देण्यात येऊ नये, २९ डिसेंबर २०१६ रोजी लागू करण्यात आलेले शुल्क त्वरीत मागे घेण्यात यावे, ग्रामीण भागातील आॅटो चालकांना समोर करून व त्यांचा विचार करूनच कोणतेही नियम पारित करण्यात यावे, २०० रुपयांची चालान रद्द करून १०० रुपये करण्यात यावे, झालेली दरवाढ मागे न घेतल्यास परवाने काढून आॅटो खासगी करून देण्यात यावे. मागण्यांची पुर्तता ३० दिवसात करण्यात यावी, अन्यथा बेमुदत संपचा इशारा मोर्चेकरांनी दिला. (प्रतिनिधी)