पांजरा व बोरी येथील धान खरेदीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:59+5:302021-06-30T04:22:59+5:30
करडी (पालोरा ) : करडी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राला जोडण्यात आलेल्या पांजरा व बोरी गावांतील शेतकरी केंद्र संचालकाच्या ...
करडी (पालोरा ) : करडी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राला जोडण्यात आलेल्या पांजरा व बोरी गावांतील शेतकरी केंद्र संचालकाच्या मनमर्जी धोरणामुळे आक्रोशित आहेत. खरिपातील धान रोवणीला प्रारंभ झालेला असताना दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची उन्हाळी धानाची खरेदी - विक्री झालेली नाही. याप्रकरणी सात-बारा ऑनलाईन होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटत असताना, धान ठेवायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, अन्न पुरवठा सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारवजा निवेदन दिले आहे.
पांजरा व बोरी हे गावे अगोदर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र पालोरा येथे जोडलेले होते. शेतकऱ्यांचे सात-बारा ऑनलाईनही करण्यात आले होते. परंतु पालोरा येथील धान खरेदी केंद्रावर गोडाऊन उपलब्ध नसल्याने पांजरा व बोरी ही गावे नंतर करडी केंद्राला जोडली गेली. परंतु अजूनही करडी केंद्रावर पांजरा, बोरी येथील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आक्रोशाची भावना आहे.
शेतकरी धान खरेदी केंद्रावर गेले असता केंद्र संचालकाकडून टाळाटाळ केली जात आहे. नंतर खरेदी करू, आपणाला कळविले जाईल, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. करडी केंद्राअंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांनी सात-बारा ऑनलाईन केलेले आहेत. परंतु पांजरा व बोरी गावे नंतर जोडलेली असल्यामुळे तुमच्या धानाचे मोजमाप करायला वेळ लागेल, असे सांगितले जाते. पालोरा केंद्रात जोडलेली पांजरा व बोरी गावे केंद्र सुरू करण्याअगोदर करडी केंद्रात जोडायला हवी होती. आता शेतकऱ्यांचे ऑनलाईन सात-बारा पालोरा केंद्रावर आणि धानाचा काटा करडी केंद्रावर, अशा परिस्थितीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
विरोधाभासामुळे शेतकऱ्यांनी धानाचा काटा कुठे करायचा, असा पेच निर्माण झाला आहे. तरी जिल्हाधिकारी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी लक्ष देऊन पांजरा व बोरी येथील शेतकऱ्यांचा धानाचा काटा करण्यासाठी आदेशित करावे, करिता दि. २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, आमदार राजू कोरेमोरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा, तहसीलदार मोहाडी यांना निवेदनद्वारे तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे.
तक्रारकर्ते शेतकऱ्यांत सचिन साठवणे, लखपती साठवणे, परसराम लांडगे, मोनू साठवणे, वातू साठवणे, अण्णा साठवणे, उत्तम साठवणे, मारुती रोकडे, राजकुमार चौरागडे, सुनील राऊत, राजकुमार माटे, अजय रोकडे, श्रीराम राऊत, बाबूलाल राऊत, मनोहर राऊत, दादाराम चांदेवार, तेजराम राऊत यांचा समावेश आहे.
कोट बॉक्स
...तर सामूहिक उपोषणास बसू
सात-बारा ऑनलाईन होऊन बराच कालावधी लोटला आहे. अगोदर पांजरा व बोरी गावे पालोरा धान खरेदी केंद्राला जोडली होती. मात्र, नंतर करडी केंद्राला जोडली गेली, परंतु केंद्र बंद करण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना दोन्ही गावांतील जवळपास एक हजार क्विंटल धान खरेदी झालेली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तातडीने खरेदी सुरू न झाल्यास सामूहिक उपोषणास बसणार आहोत. यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील.
-धनपाल माटे, शेतकरी बोरी (पांजरा)