शेती आरोग्यासाठी रासायनिक खताचा अतिवापर टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:08+5:302021-07-04T04:24:08+5:30

करडी (पालोरा) : शेतकऱ्यांनी वेळेवर खतव्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्याचबरोबर पिकांची निरीक्षणे योग्य पद्धतीने घेतल्यास रोगव्यवस्थापनावरील ...

Avoid excessive use of chemical fertilizers for agricultural health | शेती आरोग्यासाठी रासायनिक खताचा अतिवापर टाळा

शेती आरोग्यासाठी रासायनिक खताचा अतिवापर टाळा

googlenewsNext

करडी (पालोरा) : शेतकऱ्यांनी वेळेवर खतव्यवस्थापन केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्याचबरोबर पिकांची निरीक्षणे योग्य पद्धतीने घेतल्यास रोगव्यवस्थापनावरील खर्च कमी करता येतो. शिवाय रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याऐवजी हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, युरिया ब्रिकेटस्‌चा वापर करून रासायनिक खतावरील खर्च कमी करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.

मोहाडी तालुका कृषी विभागात महाराष्ट्र कृषिदिनी आलेल्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत, खताचे व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रण व धानाच्या नर्सरीची माहिती देताना ते बोलत होते. यापूर्वी कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत त्यांनी मुंढरी खुर्द येथील धान नर्सरीची पाहणी केली.

सध्याच्या कृषी पद्धतीत रासायनिक खताच्या अनिर्बंध वापरामुळे व अन्य कारणांमुळे या शेतीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. शेतीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खताचा संतुलित, तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी संजीवनी मोहिमेचा उद्देश रासायनिक खताचा अनिर्बंध वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार खताच्या संतुलित व कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे असा आहे.

मृद आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, गांडूळखते, युरिया ब्रिकेटस्‌ खताच्या वापरास प्रोत्साहन देणे. जमीन आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता स्थिती व त्यानुसार पिकांना द्यावयाच्या खतमात्रेची माहिती मिळते. पत्रिकेत जमिनीचा पोत, कमी झालेले घटक, योग्य खताचा वापर आणि पिकाची माहिती आहे. या पत्रिकेनुसार शेतकऱ्याने पीक घेणे अपेक्षित आहे. जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार आपल्याला संतुलित खताचा वापर करणे शक्य होते.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच मूलद्रव्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खते, हिरवळीच्या खताचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.

Web Title: Avoid excessive use of chemical fertilizers for agricultural health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.