मुदतीनंतर पैसे देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:12 AM2019-08-30T01:12:31+5:302019-08-30T01:12:49+5:30
ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत. बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त्या नवसंजिवनीचा चांगलाच फायदा पोस्ट मास्तरसह कर्मचारी उचलत असल्याचे निदर्शनात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : पोस्टात उघडलेली आरडी व इतर बचत खात्यांची मुदत संपूनही येथील पोस्टमास्तर ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत.
बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त्या नवसंजिवनीचा चांगलाच फायदा पोस्ट मास्तरसह कर्मचारी उचलत असल्याचे निदर्शनात येत आहे. तुमसर तालुक्याच्या ठिकाणी बँकीग सेवा असलेले डाकघर (पोस्ट आॅफीस) आहे. नागरिकाकडून विविध प्रकारचे आरडी व बचत खाते पोस्टाच्या अभिकर्त्यांमार्फत काढले गेले आहे.
तीन वर्षे, पाच वर्षे, १० वर्षे अशी आरडीची मॅच्युरिटी झालेले ग्राहक स्व:हक्काचे पैसे घेण्यास पोस्टात गेले असता पोस्टमास्तरकडून आज या उद्या या, असे म्हणून खाते विड्राल करण्याकरिता दीड ते दोन महिने लांबणीवर घालत आहेत. याबाबत चर्चा केल्यास केल्यास पोस्टमास्तर ग्राहकांशी असभ्य व अरेरावीने उत्तरे देत त्यांना परत पाठवित आहेत. त्यामुळे त्रस्त झालेले ग्राहक पोस्टाच्या अभिकर्त्यांना पकडून धारेवर धरत आहे.
अभिकर्ते देखील या प्रकाराला कंटाळले आहेत. त्यामुळे विश्वास संपादन केलेल्या डाक विभागात जर असेच प्रकार सुरु राहिले तर भविष्यात आरडी व इतर कलेक्शन मिळणे बंद होवून परत पोस्ट विभाग डबघाईस निघण्यास वेळ लागणार नाही. यासंदर्भात पोस्टमास्तर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.