घरकुलाची रक्कम देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:41+5:302021-09-11T04:36:41+5:30
केंद्र व राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजना आहे. त्यामध्ये १ लाख ३५ हजार रुपये लाभार्थ्याला दिले जातात. ...
केंद्र व राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजना आहे. त्यामध्ये १ लाख ३५ हजार रुपये लाभार्थ्याला दिले जातात. परंतु हा निधी लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यास पंचायत समिती पवनी यांचेकडून अनेकदा अडवणुकीचे धोरण अवलंब केले जाते. सध्याच्या परिस्थितीत घरकुल बांधण्यासाठी मिळत असलेला निधी हा अतिशय कमी आहे. लोखंड सिमेंट व इतर मजुरी खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे घरकुल निधीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी असताना याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. मंजूर निधी टप्याटप्याने दिला जातो. यासाठी ग्रामपंचायत शिफारस केली जाते. पण पंचायत समिती येथील अधिकारी अडवणूक धोरण अवलंब करतात. चिरीमिरी दिली की लवकर चेक काढतात, अशी तक्रार अनेक लाभार्थ्यांनी केली आहे. घरकुल बांधकामावर खर्च करताना कोंढा येथील अनेक लाभार्थ्यांनी लोखंड, सिमेंट उधारी घेतले आहे. त्यांचे बिल देणे बाकी आहे. लाभार्थ्याच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.