चिमुकल्या चेतनाच्या सर्जनशीलतेला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:33+5:302021-01-15T04:29:33+5:30
भंडारा : मुलांमधल्या सर्जनशीलतेला वाव मिळावा,त्यांच्या नवकल्पनांची भरारी उंच उंच जावी म्हणून स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या सहशालेय नावीन्यपूर्ण उपक्रम ...
भंडारा : मुलांमधल्या सर्जनशीलतेला वाव मिळावा,त्यांच्या नवकल्पनांची भरारी उंच उंच जावी म्हणून स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या सहशालेय नावीन्यपूर्ण उपक्रम विभागाकडून वाचन संकेतस्थळ स्पर्धा घेण्यात आली होती. मुलांची वाचनाची निश्चित जागा कोणती, बागबगिचा, शेत, स्वयंपाक खोली,अंगण,दिवाणखाना,झाडाची सावली अशा कोणत्याही स्थळाची सजावट करून मुलं वाचनाची जागा ठरवून वाचनास प्राधान्य देतील या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पहिली ते पाचवी या गटात जि.प. प्राथमिक शाळा सुरेवाडा येथील तिसरीची विद्यार्थिनी चेतना रमेश राऊन हिने वाचन स्थळाची सुंदर चित्रफित तयार करून या स्पर्धेत बाजी मारली. नववी ते बारावी गटात जि.प. हायस्कूलच्या हरीश कांबळेने पुरस्कार पटकावला. कोरोना काळ असल्याने समारंभाला फाटा देऊन पुरस्कार वितरित करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामूजी शहारे यांच्या हस्ते प्राचार्य केसर बोकडे, माध्यमिक विभागप्रमुख शालिकराम ढवळे, संस्कृत अध्यापक विजयकुमार बागडकर सहशालेय उपक्रम विभागप्रमुख स्मिता गालफाडे यांच्या उपस्थितीत चेतनाचा पुरस्कार तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका विजया प्रमोदकुमार अणेराव यांनी स्वीकारला. मुलांच्या क्रियाशीलतेला,वाचन संस्कृतीला वाव देणारे मूल्यवर्धक उपक्रम आयोजित करायला हवेत असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामूजी शहारे यांनी केले. आभार प्रदर्शन स्मिता गालफाडे यांनी केले.