पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:32+5:302021-05-12T04:36:32+5:30
तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी तसेच तालुक्यातील विविध शेतकरी गटांतील शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना ते बोलत होते. भंडारा तालुक्यातील प्रगतिशील ...
तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी तसेच तालुक्यातील विविध शेतकरी गटांतील शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना ते बोलत होते. भंडारा तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा एक शेतकरी ग्रुप तयार केला असून त्या शेतकऱ्यांना खरिपाचे मार्गदर्शन व कोरोना काळात शेतकऱ्यांनी खरिपात घ्यावयाची दक्षता यावर ते बोलत होते. यावेळी कोटांगले यांनी पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत चुका केल्याने पिकांची उत्पादकता कमी होते. या पार्श्वभूमीवर येत्या खरीप हंगामात पिकांची पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या विविध शेतकऱ्यांच्या चुका टाळून पिकांची उत्पादकता कशी वाढवावी, यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी भंडारा तालुका कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी तालुक्यातील विविध गावांत गावनिहाय शेतकरी मार्गदर्शन सभा, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके, बियाणे उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिके कृषी सहायकांमार्फत दाखविण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता घरच्या घरी तपासावी, तसेच पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे, असे आवाहन केले आहे. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य अंतरावर व खोलीवर पेरणी करावी. शिफारशीनुसार बियाण्याची मात्रा, पेरणी यंत्राने किंवा सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी करावी. एकाच गावात शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात एकाच वाणाची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी गावनिहाय बैठका सुरू असून कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बॉक्स
पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या चुका टाळा
शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकनिहाय पेरणी ते काढणीपर्यंत होणाऱ्या विविध चुका टाळण्यासाठी तसेच पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी भंडारा तालुका कृषी विभागातर्फे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यासाठी गावनिहाय बैठका घेण्यात येत असून शेतकऱ्यांनी कुठेही गर्दी करू नये. कृषी विभागाचे ऑनलाइन मार्गदर्शन, व्हिडिओ तसेच शेतकरी ग्रुपमार्फत आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.