वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 09:25 PM2023-03-24T21:25:27+5:302023-03-24T21:25:51+5:30

Bhandara News शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला.

Ax attack by mob on forest personnel; Attempt to set the vehicle on fire | वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

googlenewsNext

भंडारा : शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला. एवढेच नाही तर तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथे शुक्रवारी घडली. या घटनेमुळे वनवृत्तात एकच खळबळ उडाली आहे.

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील मौजा गोंडिटोला (सुकळी) येथील गट क्रमांक २३ व ३६/२ मध्ये १५ ते २० आदिवासी लोकांनी शासकीय जागेवर काही दिवसापूर्वी अतिक्रमण केले होते. त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देवूनही अतिक्रमण सोडले नाही. या प्रकरणी आतापर्यंत ४ वनगुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, २४ मार्च रोजी सोड्या येथील बिटरक्षक डी. ए. कहुळकर, क्षेत्र सहाय्यक यु. के. ढोके, बिट रक्षक ए. जे. वासनिक, डी. जे. उईके, वनरक्षक ए. डी. ठवकर व वनमजुर इमारचंद शिवणे हे वन कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी १०.३० वाजता दरम्यान गस्तीवर असताना त्यांना अतिक्रमण सुरू असलेले दिसले. अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टर बाहेर काढण्याकरिता सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी छगन राहांगडाले शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसह अतिक्रमणस्थळी गेले असता २५ ते ३० महिला व पुरूषांच्या जमावाने लाठ्या-काठ्या, पेट्रोलची बॉटल व कुऱ्हाडीने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात पाच वनकर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

धक्काबुक्की व धमकी
वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले व बिटरक्षक कहुळकर यांचे कॉलर पकडून जमावाने धक्काबुक्की केली. इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ निघुन जा, अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकु व पेट्रोल टाकून पेटवू, अशी धमकी दिल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जमावाने दगडफेक करून एमएच ३६ के १८१ या शासकिय वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Ax attack by mob on forest personnel; Attempt to set the vehicle on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.