‘नीट’च्या परीक्षेत बेलाचा आयूष रामटेके जिल्ह्यात टॉपर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 12:16 PM2023-06-15T12:16:33+5:302023-06-15T12:17:24+5:30
परीक्षेत मुलांची भरारी : सरावावर दिला अधिक भर
भंडारा : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता एनटीआयकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा (नीट-यूजी २०२३)च्या परीक्षेत भंडारा जिल्ह्यातील आयूष राजकुमार रामटेके हा जिल्ह्यातून टॉपर ठरला आहे. ९९.९९ टक्के गुण मिळवून त्याने या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
आयूष देशात सातवा असून, राज्यातून चौथा आहे. एकूण ७२० गुणांपैकी आयूषला ७१० गुण मिळाले असून, फिजिक्स, केमेस्ट्री, बॉयाेलाॅजी या सर्व विषयांत त्याला ९९ टक्क्यांहून अधिक गुण आहेत. त्याचे वडील राजकुमार रामटेके हे शिक्षक असून, आई अल्का या गृहिणी आहेत.
मंगळवारी रात्री या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. यात आयूष रामटेके भंडारा जिल्ह्यातून टॉपर राहिल्याचे दिवसभरात स्पष्ट झाले. नीट-यूजीची परीक्षा ७ मे रोजी घेण्यात आली होती. १३ जूनला सायंकाळी निकाल जाहीर झाला. नीट यूजीसाठी देशभरातून २०,८७,४६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०,३८,५९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील ११,४५,९७६ विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यात महाराष्ट्रातील १,३१,००८ विद्यार्थी आहेत. ४९९ शहरातील ४,०९७ केंद्रांवर परीक्षा पार पाडली. आयूषने बेला (जि. भंडारा) येथील महेंद्र सायन्स कॉलेज या केंद्रावरून परीक्षा दिली होती.
वैद्यकीय क्षेत्रात कमवायचेय नाव
‘लोकमत’शी बोलताना आयूष म्हणाला, आपणास वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करायचे होते. हे आधीपासूनच ठरविले होते. ओयासिस इंटरनॅशनल स्कूलचा त्याने या यशात आवर्जून उल्लेख केला. या चमकदार कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.