वरठी येथील इंग्रजकालीन तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:25+5:302021-09-19T04:36:25+5:30
वरठी : रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील इंग्रजकालीन सात वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाच्या आर्षणाचे केंद्र असलेला ...
वरठी : रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील इंग्रजकालीन सात वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाच्या आर्षणाचे केंद्र असलेला हा तलाव दुर्लक्षित असून सनफ्लॅग कंपनीच्या सीएसआर निधीतून होणारे सौंदर्यीकरणचे कामही कासवगतीने सुरू आहे. सात वर्षांतही काम पूर्ण न करण्याचे पराक्रम सनफ्लॅग व्यवस्थापनाने केले आहे. दुसरीकडे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत असल्याने नागरिकांत रोष दिसत आहे.
वरठी येथे असलेल्या या तलावाचा उपयोग स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे इंजिनला पाणी पुरविण्यासाठी होत होता. रेल्वेस्थानकापासून तलावापर्यंत जुने रूळ होते. कालांतराने वाफेचे इंजिन बंद झाल्याने हा तलाव निरुपयोगी ठरला. मात्र गावाच्या मध्यभागी असल्याने या तलावाचे सौंदर्य कमी झाले नाही. उन्हाचा पारा कितीही चढला तरी तलावात पाणी कायम राहते. यामुळे गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखे होईल; पण लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे काम रखडले आहे.
वरठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांच्या संकल्पनेतून माजी सरपंच संजय मिरासे यांच्या काळात तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. २०१४ साली रेल्वेने सदर तलावाचे सौंदर्यीकरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. यात तलावाच्या चारीही बाजूंना काठांची निर्मिती करून बैठकीची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. तसचे तलावातील गाळ काढून पायऱ्या व परिसरातील चारीही दिशांना विद्युत्दीप लावायचे होते. मात्र आता सौंदर्यीकरणचे काम सात वर्षांपासून अर्धवट आहे. काम पूर्णत्वास नेण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. तलावाच्या काठांचे काम पूर्ण झाले असून, काही भागांत विद्युत व्यवस्था उभारण्यात आली आहे. पाण्याचा ओव्हरफ्लो व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत खांब उभारले असून त्यावर दिवे लावण्यात आले. पण अनेक दिवसांपासून ते शोभेची वस्तू ठरत आहेत.
बॉक्स.
सार्वजनिक उपयोगाचे एकमेव ठिकाण
पूर्वीच्या काळात सार्वजनिक उपयोगाचा एकमेव स्रोत म्हणजे हा तलाव होय. धार्मिक विधी व सार्वजनिक उत्सवादरम्यान मोठी गर्दी व्हायची. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने तलाव निरुपयोगी झाला. नियमित साफसफाई होत नसल्याने गावातील सार्वजनिक व घरगुती विसर्जन गावाबाहेर नदीत करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वी तलावाच्या काठांवर वृक्षारोपण करण्यात आले होते. फोटो काढण्यापुरती झाडे लावून प्रशासन मोकळे झाले. झाडे जगवण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. वृक्षरोपण करताना कठडे व नियमित पाणीपुरवठा न झाल्याने सगळी झाडे वाळली आहेत.
कचराकुंडीचे स्वरूप
देखभाल-दुरुस्तीअभावी तलावाला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाच्या मध्यभागी आकर्षणाचे केंद्र असलेल्या तलावाला कचऱ्याचे माहेरघर बनविण्यात आले. तलावाच्या काठावर सर्वत्र घाण पसरलेली आहे. तलावाच्या काठाचा वापर शौचालय म्हणून होताना दिसते. तलावाचे पाणी कचऱ्याने भरून गेले आहे.
सनफ्लॅग चे वेळकाढू धोरण
गावात असलेला सनफ्लॅग कारखाना गावकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. स्थानिक युवकांपेक्षा परप्रांतीय लोकांना रोजगार देणाऱ्या सनफ्लॅग व्यवस्थापनाने स्थानिक विकास कामात नेहमी उपेक्षा केली आहे. राजकीय दबावात सनफ्लॅग कंपनीचा सीएसआरचा निधी इतरत्र वाळवून तात्काळ कामे केली जातात. पण सात दिवसाच्या तलावाच्या कामाला सात वर्ष लोटूनही पूर्ण झाले नाही. त्यांच्या ऐवजी स्थानिक प्रशासनाने काम करावे अशी एकमुखी मागणी होत आहे.
180921\img_20210918_153018.jpg~180921\img_20210918_153013.jpg
तलावाच्या पाळीवर वाढलेले झुडूप~तलावात असलेली घाण