ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदाचा अनुशेष
By admin | Published: May 24, 2015 01:18 AM2015-05-24T01:18:02+5:302015-05-24T01:18:02+5:30
दर्जेदार आरोग्य सुविधा तथा स्वच्छतेकरिता नागरिक आणि रुग्ण यांनी सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला उत्तमतेची पावती दिली असताना आ.चरण वाघमारे यांच्या अकस्मात भेटीत ...
चुल्हाड (सिहोरा) : दर्जेदार आरोग्य सुविधा तथा स्वच्छतेकरिता नागरिक आणि रुग्ण यांनी सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयाला उत्तमतेची पावती दिली असताना आ.चरण वाघमारे यांच्या अकस्मात भेटीत सभापती कलाम शेख यांनी समस्यांचा डोंगर मांडला. यावेळी एन.सी.डी. योजना शासनाने बंद केल्याने त्यांनी विरोधही केला.
५७ गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सिहोऱ्यात ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. या रुग्णालयात दर्जेदार सेवा रुग्णांना दिली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खुणे आणि कार्यरत कर्मचाऱ्याच्या प्रयत्नाने रुग्णालयात स्वच्छता ठेवण्यात येत आहे. नजिकच्या मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात धाव घेत आहे.
अन्य रुग्णालयांना प्रेरणा ठरणारे वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सेवेसंदर्भात तक्रार नाही. या रुग्णालयाला आ.चरण वाघमारे यांनी अकस्मात भेट देवून पाहणी केली. रिक्त पदांचा अनुषेक असतानाही दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यात येत असल्याचे चित्र दिसले. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी १, अधिपरिचारिका २, क्ष किरण तंत्रज्ञ १, एक्सरे टेक्नीशियन १, शिपाई १, कक्ष सेवक १ अशी पदे रिक्त आहेत.
या शिवाय खानावळी उपलब्ध नाही. रुग्णालयात शवविच्छेदन गृहाची निर्मिती करण्यात आली असली तरी अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकारी ही सेवा देण्यासाठी तयार असताना जिल्हा आरोग्य विभाग गंभीर होत नाही. यामुळे २० कि.मी. अंतरावरील तुमसरात नातेवाईकांना धाव घ्यावी लागते.
राज्याच्या आरोग्य विभागाने गरीबांना देण्यात येणारी एनसीडी योजनेअंतर्गत नि:शुल्क उपलब्ध करणारी तपासणी सेवा बंद केली आहे.
यामुळे अन्याय करणारा निर्णय आहे. असा आरोप सभापती कलाम शेख यांनी केला. या योजने अंतर्गत वैद्यकीय अधिकारीसह ५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली होती. यात कॅन्सर, ब्लड प्रेशर, शुगर, रक्त आदी तपासणी करीत होते.
ही तुपासणी रुग्णालयात तथा गावागावात कॅम्प, शिबिराच्या आयोजनात होत होती. परंतु राज्य शासनाने ही योजना बंद केली आहे. ग्रामीण भागात सामान्य गरीबांना नि:शुल्क तथा अल्प दरात उपलब्ध होणारी सेवा बंद करण्यात आल्याने खासगी लॅबमध्ये तपासणी करावी लागत आहे.
राज्य शासनाना हा निर्णय गरीबांच्या विरोधात जाणारा असल्याने सभापती कलाम शेख यांनी या निर्णयाची आठवण ताजी करून दिली. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांना निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले, बाला तुरकर, गजानन निनावे, मयूरध्वज गौतम, अशोक पटले, भास्कर सोनवाने, मुन्ना फुंडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)