मोहाडी व भंडारा तालुक्यात पुन्हा अवकाळीचा दणका
By युवराज गोमास | Published: May 28, 2023 05:37 PM2023-05-28T17:37:05+5:302023-05-28T17:39:24+5:30
वादळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचे मोठे नुकसान झाले.
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागात रविवारला दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा वादळी मुसळधार पावसाचा दणका बसला. वादळी वाऱ्यामुळे शाळा, महाविद्यालय, कौलारू घरे व टिनाचे शेड उडाली. मुसळधार पावसाने कौलारू घरांची हाणी झाली. शेतशिवार व रस्त्यांवरील झाडे उन्मळून कोसळली. यामुळे मोहाडी शहरातील अनेक रस्ते बंद पडले होते. वादळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचे मोठे नुकसान झाले.
राज्यात मान्सूनला अद्यापही उशिर असतांना भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने दोन दिवसांपासून थैमान घातले आहे. शनिवारला मोहाडी व पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. पालांदूर येथील आठवडी बाजारात धावपळ उडाली. शेतीचे नुकसान झाले. रविवारला पुन्हा मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागात दुपारच्या सुमारास वादळी मुसळधार पावसाच्या धारा कोसळल्या. मोहाडी शहरात वादळामुळे घरांवरील टिनाचे शेड उडाले. शेतातील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. जवाहरनगर परिसरातही वादळी पावसाने हाल झाले.