पाण्याची बाटली घेण्यासाठी उतरणे पडले महागात; ३० लाखांचे सोने असलेली बॅग एसटीतून लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 12:29 PM2022-06-07T12:29:49+5:302022-06-07T14:21:24+5:30
याप्रकरणी साकोली पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रात्री दहानंतर गुन्हा नोंदविला.
साकोली (भंडारा) : पुणे येथील सराफा व्यापाऱ्याच्या दिवाणजीची २५ लाख ९३ हजार रुपये किमतीचे ४७१ ग्रॅम सोन्याचे दागिने व चार लाखाची ८२ ग्रॅम सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास केल्याची घटना साकोली बसस्थानकावर रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. बस थांबल्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी दिवाणजी उतरले असता तीन चोरट्यांनी बॅग लंपास केल्याचा संशय आहे. याप्रकरणी साकोली ठाण्यात रात्री तक्रार दिल्यानंतर चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरू केला.
राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड (२४, रा. नागाने, राजस्थान) असे दिवाणजीचे नाव असून, तो पुणे येथील भवरलाल त्रिलोकचंद अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत आहे. ३० मे रोजी जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व बिस्किटे घेऊन तो निघाला होता. रायपूर, राजनगाव, बालाघाट आणि गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून तो भंडारा येथे जाण्यासाठी रविवारी सायंकाळी बसमध्ये बसला. रात्री ७ वाजताच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर आली. तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी दिवानजी खाली उतरला. बसमध्ये आल्यानंतर पाहतो तर सीटवरील बॅग गायब झाली होती. घाबरलेल्या स्थितीत खाली उतरुन त्याने तत्काळ आपल्या मालकाला फोन करुन घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर साकोली ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रात्री दहानंतर गुन्हा नोंदविला.
दरम्यान, रात्रीच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, भंडारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी साकोलीला भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या चमू रवाना रवाना करण्यात आल्या. दिवाणजीला पोलिसांनी तक्रारीनंतर साकोलीत थांबवून घेतले. त्याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.
गोंदियापासून सुरू होता पाठलाग
दिवाणजी राजेंद्रसिंग राठोड रविवारी सायंकाळी गोंदियावरून भंडारा जाण्यासाठी बसमध्ये बसला. त्यावेळी त्याच्या मागील सीटवर गोंदियावरून तीन व्यक्ती बसल्या होत्या. त्या तिघांनीच दागिन्यांची बॅग पळविल्याचा संशय आहे. एवढ्या मोठ्या किमतीचे सोने जवळ असताना दिवाणजी बॅग बसमध्येच ठेवून खाली उतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.