बजाज फायनांसचे ७० लाख उडविले क्रिकेट सट्ट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:36 PM2018-11-19T21:36:20+5:302018-11-19T21:36:42+5:30
क्रिकेट सट्ट्याच्या नादात येथील बजाज फायनांसच्या प्रबंधक व रोखपालाने तब्बल ७० लाख रूपये उडविल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून पैसा लावून रातोरात श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात आता दोघेही पोलीस कोठडीची हवा खात आहेत. जगभरात कुठेही क्रिकेटची मॅच असली की त्यावर हे दोघे सट्टा लावला होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रिकेट सट्ट्याच्या नादात येथील बजाज फायनांसच्या प्रबंधक व रोखपालाने तब्बल ७० लाख रूपये उडविल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून पैसा लावून रातोरात श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात आता दोघेही पोलीस कोठडीची हवा खात आहेत. जगभरात कुठेही क्रिकेटची मॅच असली की त्यावर हे दोघे सट्टा लावला होते.
भंडारा येथील राजीव गांधी चौकात बजाज फायनांस कंपनीचे आॅफिस आहे. या कार्यालयात हेमराज प्रभाकर ठेकल (३२) रा. अयोध्यानगर साईमंदिर रोड, नागपूर हा प्रबंधक तर आशुतोष आनंद पचारे (२४) रा. समृद्धीनगर तकीया वॉर्ड, भंडारा हा रोखपाल म्हणून कार्यरत होता. आॅगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात ग्राहकांकडून गोळा झालेले ७० लाख ४६ हजार ७४१ रूपये कंपनीच्या खात्यात जमाच केली नाही. हा प्रकार अंकेक्षणात पुढे आला. एवढी मोठी रक्कम नेमकी गेली कुठे, असा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला. कंपनीची रक्कम रोखपाल आशुतोष पचार आणि प्रबंधक हेमराज ढेकल यांच्या ताब्यात असते. ग्राहकांकडून गोळा झालेली रक्कम तात्पूरती कंपनीतील लॉकरमध्ये ठेवावी लागते. त्यानंतर ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत फायनांस कंपनीच्या खात्यात भरली जाते. कंपनीतील लॉकरच्या दोन चाब्या आहेत.
एक चाबी रोखपालाकडे तर दुसरी चॅबी कॅशियरकडे असते. त्यामुळे या दोघांनीच ही रक्कम हडपल्याचा संशय आला. त्यावरून बजाज फायनांसचे अधिकृत अधिकारी पंकज गजानन गायकवाड यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ चौकशी करून प्रबंधक हेमराज ढेकन व रोखपाल आशुतोष पचारे या दोघांना अटक केली. त्यांची पोलीस कोठडी घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली.
आशुतोष हा पुर्वीपासूनच क्रिकेट सट्ट्यावर पैसे लावत होता. सदर कंपनीत नोकरी लागल्यानंतर या प्रकारात वाढ झाली. पैशासाठी त्याने प्रबंधकाला हाताशी धरले. एवढेच नाही तर विश्वास संपादन करून लॉकरच्या दोन्ही चाब्या आशुतोषने आपल्याकडेच ठेवून घेतल्या. फायनांसमध्ये ग्राहकाने भरलेल्या रक्कमेची रितसर पावती दिली जायची. त्यामुळे यात ग्राहकांचे कोणतेही नुकसान नाही. परंतु लॉकरमध्ये ठेवलेले पैसे काढून आपण क्रिकेटवर लावत होता, असे पोलीस कोठडीदरम्यान आशुतोष पचारे याने कबूल केले.
जगात कुठेही क्रिकेटची मॅच सुरू असली तरी तो त्यावर बेटींग करीत होता. त्यासाठी डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु डॉट बीएसएफ बेट डॉट कॉम या साईडवरून तो पैसे लावत होता. आॅनलाईन पद्धतीने अॅपच्या माध्यमातून बेटींग करताना तो बँकेतील इतर कर्मचाºयांनाही सहभागी करून घ्यायचा. कारण या अॅपच्या माध्यमातून इतरांना सहभागी करून घेतले तर त्याला वेगळे कमिशन मिळाचे. दोन महिन्यात या दोघांनी तब्बल ७० लाख रूपये क्रिकेटच्या बेटींगवर लावले. त्यात दोघेही हरल्याने बँकेच्या लॉकरमध्ये पैसे भरू शकले नाही आणि तेथूनच या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, ठाणेदार सुधाकर चव्हाण करीत आहेत.
झोपी गेला अन् २७ लाख जिंकला
आशुतोष पचार हा सुरूवातीपासूनच क्रिकेटवर सट्टा लावत होता. काही महिन्यापूर्वी त्याने मोबाईल अॅपच्या माध्यमातून एका मॅचवर पैसे लावले. ही मॅच पराभवाचा स्थितीत आली होती. त्यावेळी सर्वांनी त्याच्यावरील पैसा काढून घेतला होता. मात्र आषुतोश झोपी गेल्याने त्याचा पैसा त्याच संघावर राहीला. सुदैवाने तोच संघ या मॅचमध्ये जिंकला आणि आशुतोषला २७ लाख रूपयांचा फायदा झाला. त्यामुळे त्याची हिम्मत वाढत गेली आणि फायनांस कंपनीतून पैसे काढत गेला.