बालभारतीच्या कंत्राटदारांनी कोंडला कोऱ्या पुस्तकांचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:32+5:302021-09-07T04:42:32+5:30
मोहाडी : कोरी पुस्तके चाळताना आनंदाला उधाण येतो. तसा कोऱ्या पुस्तकांच्या पानांचा सुगंधच न्यारा असतो नाही का. तथापि, ...
मोहाडी : कोरी पुस्तके चाळताना आनंदाला उधाण येतो. तसा कोऱ्या पुस्तकांच्या पानांचा सुगंधच न्यारा असतो नाही का. तथापि, सर्व शिक्षा अभियानअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारी पुस्तके कुलूपबंद झाल्याने जिल्ह्यात पुस्तकांचा श्वासच कोंडला आहे. गटसाधन केंद्रात अकरा हजार पुस्तकांचा खच पडून असून या पुस्तकांचा खोलीत सुगंध घुसमटतोय.
शैक्षणिक सत्र जून महिन्यात सुरू झाले. तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. पुढच्या महिन्यात शालेयस्तरावर घटक चाचण्या होणार आहेत. पण, अद्यापही पुस्तके गट साधन कार्यालयाच्या एका खोलीत कुलूपबंद आहेत. विद्यार्थ्यांना जुने पुस्तके आधी परत केले आहेत. त्यानंतर लगेच सेतू अभ्यास आला. त्यामुळे पुन्हा पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. १५ पर्यंत सेतू अभ्यासाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर ती पुस्तके विद्यार्थ्यांकडे पडून आहेत. काहींनी परत दिली. तथापि, पुढच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडलीच नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वी पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके शाळांना पुरवठा करण्यात आली नाहीत. विद्यार्थ्यांच्या हातात अजूनपर्यंत पुस्तके मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्याच्या गटसाधन केंद्रात पुस्तके आली. पण ती पुस्तके तीन महिन्यांपासून बंद खोलीत पडून आहेत.
पुस्तके तशीच पडून असल्याने पुस्तकांवर धूळ जमा झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका खोलीत पुस्तकांचा श्वास कोंडला गेला आहे. त्या अकरा हजार पुस्तकांचा सुगंध बंद खोलीत घुसमटत आहे. नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात पाडण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. पुस्तके केंद्र स्तरापर्यंत पोहोचवून देण्याचे कंत्राट बालभारतीने एकाकडे दिले आहे. त्यामुळे पुस्तक केंद्रस्तरापर्यंत येण्यास उशीर होत असल्याचे शिक्षण विभाग पंचायत समितीकडून सांगण्यात आले. आता किती दिवस बंद खोलीत पुस्तके पडून राहणार याचा अंदाज नाही. कारण कंत्राटदार कधी पुरवठा करणार हे अजूनही निश्चित नाही.
अनुदानित शाळा
पहिली ते आठवी खासगी शाळा -१०७
पहिली ते आठवी जिल्हा परिषद शाळा -३८
वर्ग पुस्तक संच विद्यार्थी संख्या
पहिला ६५४ १२५०
दुसरा १०२१ १६४५
तिसरा ११८५ १२३५
चौथा १५२० १५६६
पाचवा १६८३ १७३०
सहावा १६४८ १७७४
सातवा १६३७ १७३१
आठवा १६९३ १८७२
कोट
बालभारतीकडून केंद्रस्तरावर पुस्तके पोहोचवून देण्याचे काम कंत्राटदारांनी सुरू केले आहे. साकोली तालुक्यातून पुस्तके पोचवून देण्याची सुरुवात झाली आहे.
- मनोहर बारस्कर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा