रस्त्यावरील गिट्टी उखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:33 AM2018-06-10T01:33:42+5:302018-06-10T01:33:42+5:30
चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : चान्ना-कोडका ते पांढरवाणी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. आता रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. सध्या हा मार्ग एकेरी मार्ग आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी चान्ना, कोडका, पांढरवाणी, परसोडी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.
चान्ना, कोडका गावाचा परसोडी (रैय्यत) या गट ग्रामपंचायतमध्ये समावेश होतो. पांढरवाणी गावावरुन परसोडी (रैय्यत) येथे ग्रामपंचायतीचे विविध प्रमाणपत्र घेण्यासाठी जावे लागते. तसेच तलाठी कार्यालय पांढरवाणी येथे सुद्धा या मार्गाने जावे लागते. चान्ना, कोडका ते पांढरवाणी हा मार्ग एकेरी मार्ग आहे. त्यामुळे वाहतुकीला फारच अडचण होते. पावसाळ्यात या मार्गाने ये-जा म्हणजे तारेवरची कसरत असते. चार-पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. त्यावेळी फक्त अर्धा किलोमीटर रस्त्याचेच खडीकरण करण्यात आले होते. अडीच किलो मीटरचे रस्ता डांबरीकरण करणे कंत्राटदाराने सोडून दिले होते. या रस्त्यावरील गिट्टी उखडल्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. एकेरी वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, असे सुनील उरकुडे व इतर ग्रामवासीयांनी सांगितले.
पांढरवाणी, परसोडी, कोकणा येथील गावकऱ्यांना साकोली, सानगडी, लाखांदूर या गावांकडे जायला हा रस्ता जवळ होतो. त्यामुळे या गावातील ग्रामवासीयांची गैरसोय होत आहे.
चान्ना-कोडका ते पांढरवाणी या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी चान्ना-कोडका, पांढरवाणी, सालई, परसोडी, कोकणा येथील ग्रामवासीयांनी केली आहे.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
अनेकदा या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात आली. एकेरी रस्ता असल्यामुळे रहदारीला फारच अडचण होते. एकावेळी एकच वाहन या रस्त्याने जाऊ शकते. पावसाळ्यात या रस्त्याने जाणे-येणे जिकरीचे होते. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
-सुनील उरकुडे, ग्रामस्थ, चान्ना-कोडका.