भाजी व्यापाऱ्यांचे ‘बीटीबी’ विरूद्ध बंड

By admin | Published: October 4, 2016 12:30 AM2016-10-04T00:30:54+5:302016-10-04T00:30:54+5:30

जलशुद्धीकरण केंद्राजवळ महिला व बाल रूग्णालयाला नाकारून पालिकेने ही जागा भाजी बाजारासाठी दिली.

A ban against vegetable traders' BTB | भाजी व्यापाऱ्यांचे ‘बीटीबी’ विरूद्ध बंड

भाजी व्यापाऱ्यांचे ‘बीटीबी’ विरूद्ध बंड

Next

निषेध नोंदविला : पालिकेने दिली १ लाखात दीड एकर जागा
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्राजवळ महिला व बाल रूग्णालयाला नाकारून पालिकेने ही जागा भाजी बाजारासाठी दिली. ही जागा महिला रूग्णालयाला पाहिजे, या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने केल्यानंतरही ‘बीटीबी’ नामक कंपनीने १० दिवसांपूर्वी या जागेवर थोक भाजी बाजार सुरू केला होता. दरम्यान, भाजी बाजाराचा प्रमुखाविरूद्ध बंड पुकारात संतप्त भाजी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मोठा बाजार या जुन्या ठिकाणी नेली.
१० दिवसांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या भाजी मंडीत व्यापाऱ्यांनी दुकाने लावली होती. दरम्यान रविवारला दुकानाचे फलक व साहित्य काढले. तत्पुर्वी या व्यापाऱ्यांनी बीटीबी बाजारासमोर फटाके फोडून व ढोलताशा वाजवून जुन्याच ठिकाणी साहित्य हलविले.
महात्मा फुले भाजी विक्रेता असोशिएशनच्यावतीने मोठा बाजार चौकात बाजार भरत होता. येथील ठोक भाजी विक्रेत्यांकडे जागा नसल्यामुळे त्यांनी पर्यायी पालिकेला जागेची मागणी केली होती. त्यावेळी बंडू बारापात्रे यांनी भाजी विक्रेत्यांच्या संमतीने भंडारा येथील शीट क्रमांक ५४, प्लॉट क्र.२०/४ मधील १.५० एकर जागेत बीटीबी नामक ठोक भाजी व्यापार सुरू केला. तेव्हापासूनच ही जागा वादग्रस्त ठरली. या बाजारात १० दिवसांपूर्वी ४० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पाच दिवस बाजार सुरळीत चालल्यानंतर ‘बीटीबी’ कंपनीचे बंडू बारापात्रे यांनी नेमलेल्या माणसांकडून भाजी व्यापाऱ्यांना दमदाटी करू लागले. त्यामुळे सर्व व्यापारी एकत्र येऊन ‘बीटीबी’ या कंपनीच्या भाजी बाजारात राहायचे नाही, असा निर्धार करून सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे फलक काढून साहित्य जुन्या बाजाराच्या ठिकाणी हलविले. बीटीबीचा निषेध करण्यासाठी मुख्य मार्गावरून रॅली काढली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोठा बाजारात रॅलीचा समारोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)

स्मरणपत्र झिडकारले
बीटीबी असोसिएशनचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांना पालिकेने १२ व १४ सप्टेंबर रोजी स्मरणपत्र दिले होते. या नोटीसांना बारापात्रे जुमानले नाही. या भाजी बाजारात सार्वजनिक सुविधा असणे बंधनकारक असताना कोणत्याही सार्वजनिक सुविधा नाहीत. बीटीबीमध्ये व्यवसाय सुरू करण्यापुर्वी व्यावसायिकांनी पालिकेला लेखी लिहून दिलेले नाही. व्यावसायिकांनी पालिकेचा परवाना घेतलेला नाही. त्यामुळे करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे करारनामा रद्द करण्यात येईल, सदर जागेचा वापर बंद करण्याबाबत पालिकेला अहवाल द्यावा, असेही पालिकेने बारापात्रे यांना नोटीसादाखल सांगितले होते. परंतु, एकाही नोटीसाला बारापात्रे यांनी उत्तरे दिली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
बीटीबीच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या भाजी बाजारात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच भाजी व्यापाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तक्र ारीनुसार, बंडू बारापात्रे यांनी व्यापाऱ्यांना प्रति दुकान ५ लाख रूपयांची मागणी केली. प्रतिदिन १०० रूपये वसूली सुरू केली. यात आमची दिशाभूल करून भाजी बाजार स्थलांतरीत केला. यापूर्वीचा महात्मा फुले भाजी बाजारची नोंदणी न करता स्वत:च्या कुटूंबियांचा व मित्र परिवाराच्या नावे नवीन नोंदणी करून पालिकेसोबत करारनामा केला. त्यामुळे आम्हाला जुन्याच जागेवर व्यवसाय करायचे म्हटले होते. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते.

Web Title: A ban against vegetable traders' BTB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.