सर्वसामान्यांना बंदी, अप-डाऊन बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:00 AM2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:12+5:30

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन कर्मचारी प्रत्येकाची तपासणी करताना दिसून येतात. टेंपरेचर गनने तापमान घेतले जाते. परंतु याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे तापमान मोजले जात नाही. सरळ आपल्या कक्षात जाऊन अधिकारी स्थानापन्न होतात. भंडारा शहरात राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकदा ठिक आहे. परंतु जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी - अधिकारी नागपूरवरून नियमित जाणे येणे करतात.

Ban on the general public, up-down without hesitation | सर्वसामान्यांना बंदी, अप-डाऊन बिनधास्त

सर्वसामान्यांना बंदी, अप-डाऊन बिनधास्त

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूट, महानगरातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्याच्या आदेशाला केराची टोपली, संसर्गाचा धोका कायम

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यानंतर सर्वसामान्य अभ्यागतांना दहा दिवस जिल्हा परिषदेत प्रवेशबंदी करण्यात आली. मात्र या दरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसत असून यातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी नागपूरसह इतर ठिकाणाहून अपडाऊन करतात. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्हा परिषद सर्वसामान्यांसाठी लॉकडाऊन केली असली तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र यात सूूट दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी १५ जुलै रोजी कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले. प्रशासनासह जिल्ह्यात खळबळ उडाली. १६ जुलैपासून २० जुलैपर्यंत जिल्हा परिषद लॉकडाऊन करण्यात आली. संपूर्ण जिल्हा परिषदेला सॅनिटाईज करण्यात आले. दरम्यान सोमवारपासून जिल्हा परिषदेचे कामकाज नियमित सुरु झाले. ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या ठिकाणी बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जात नाही.
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन कर्मचारी प्रत्येकाची तपासणी करताना दिसून येतात. टेंपरेचर गनने तापमान घेतले जाते. परंतु याच प्रवेशद्वारातून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे तापमान मोजले जात नाही. सरळ आपल्या कक्षात जाऊन अधिकारी स्थानापन्न होतात. भंडारा शहरात राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकदा ठिक आहे. परंतु जिल्हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी - अधिकारी नागपूरवरून नियमित जाणे येणे करतात. कोरोना संसर्गाच्या काळातही ही मंडळी नेमून दिलेल्या दिवशी जिल्हा परिषदेत उपस्थित असतात. नागपूर शहर कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट झाले आहे. त्यात शहरातून अधिकारी-कर्मचारी येत असल्याने भंडारा शहरात राहणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत असते. नागपूरवरून येणाऱ्यामध्ये शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासन, कृषी, समाजकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत कुणीही शब्द बोलायला तयार नाही. नागपूरवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी अथवा वैद्यकीय प्रमाणपत्रही घेतले जात नाही. हा प्रकार दोन दिवसांपासून सुरु आहे. मात्र त्याचवेळी भंडारा जिल्ह्यातील कुणी अभ्यागत गेला तर त्याला प्रवेशद्वारावर रोखले जाते. जिल्हा परिषदेचे दुसरे प्रवेशद्वारही कुलूपबंद करण्यात आले आहे. प्रशासानची यामागील भूमिका चांगली असली तरी नागपूर वरून येणारे अधिकारी-कर्मचारी मात्र याला छेद देत आहेत. कोरोनाचा संसर्ग पुन्हा झाला तर काय? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत काय? अशीही कुजबूज जिल्हा परिषद वर्तूळात दिसत आहे.
चेकपोस्टवर नियंत्रण नाही
राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे पोलीस आणि आरोग्य विभागाचे चेकपोस्ट आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाते. महानगरातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. सुरुवातीला या ठिकाणी अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली जात होती. पोलीस प्रत्येक वाहन अडवित होते. मात्र एका अपघातात पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी जखमी झाले त्यानंतर या चेकपोस्टवरील नियंत्रण गेल्याचे दिसत आहे. कुणीही थेट बॅरिकेट्स पार करून निघताना दिसत आहेत. कोणत्याही वाहनाला येथे थांबविले जात नाही.

नागपूरहून दुचाकीने प्रवास
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना शासकीय वाहन भंडारा जिल्ह्याबाहेर वापरण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंदी आणली आहे. मात्र त्यावरही अनेकांनी तोडगा काढून आता नागपूरवरून दुचाकीने अपडाऊन सुरु केले आहे. अनेक अधिकारी सकाळी १० वाजता पोहचतात आणि सायंकाळी पुन्हा नागपूरकडे निघतात. जिल्हा परिषदेच्या आवारात दुचाकीची मोठी गर्दी गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. यातील बहुतांश दुचाकी या नागपूर पासिंगच्या असल्याचे स्पष्ट दिसते.

कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषद १६ जुलै पासून पाच दिवस बंद करण्यात आली होती. येत्या शनिवारपर्यंत कुठल्याही अभ्यागतांना जिल्हा परिषदेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. या संदर्भात सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रमाणपत्र सादर करण्याचेही निर्देश दिले असून महानगरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कुठलीही तक्रार असल्यास त्यावर निश्चित कारवाई करू.
- भूवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.

Web Title: Ban on the general public, up-down without hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.