मॅगनिज उत्खनन बंदीचा फज्जा
By admin | Published: November 27, 2015 12:51 AM2015-11-27T00:51:37+5:302015-11-27T00:51:37+5:30
मॅगनिज उत्खननावर बंदी असली तरी, तुमसर व मोहाडी तालुक्यात महसूल आणि वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे.
माफियांचे प्रस्थ : वन, महसूल व पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
तुमसर : मॅगनिज उत्खननावर बंदी असली तरी, तुमसर व मोहाडी तालुक्यात महसूल आणि वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. मॅगनिज माफियांचा तालुक्यात प्रचंड सुळसुळाट झाला असून, जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या मॅगनिजची नागपूर जिल्ह्यात वाहतूक करण्यात येत आहे. यात वन विभाग, पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा आहे.
तुमसर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मॅगनिजचे उत्खनन सुरू आहे. वनक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी असलेले वनकर्मचारी व क्षेत्रसहाय्यकांच्या नजरेसमोर अशाप्रकारे उत्खनन सुरू आहे. चोरट्या मार्गाने मॅगनिजच्या खडकाची रात्रीच्या वेळी रामटेकडे वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी हे मॅगनिज ट्रकद्वारे नागपूर जिल्ह्यात पाठविले जाते. जंगलातून खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या कार्यालयासमोरून जातात. परंतु, त्यांची साधी चौकशीही केली जात नाही. परिसरात वन व महसूल विभागाच्या जागेत अवैधपणे मॅगनिज उत्खनन करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. मात्र, हा आदेश पायदळी तुडवून मॅगनिजची चोरी सुरु आहे. यामुळे महसूल व वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात राजरोसपणे होत असलेल्या मॅगनिज चोरीत वन, महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी व राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे संगनमत असल्याने मॅगनिज चोरीला ऊत आला आहे.
या चोरट्या व्यवसायात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीलही मॅगनिज माफियांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यात पर्यावरणविषयक समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
नदीपात्रातून उत्खनन होणाऱ्या रेतीतून जिल्हा प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न मिळते. तरी या व्यवसायातील होणारा चोरटा व्यवसाय व त्याला मिळणारी अधिकाऱ्यांची साथ त्यातून बुडणारे महसूल हा विषय आता सर्वश्रूत झाला आहे. एखादा रेतीघाट खरेदी करायचा व त्याला लागून असलेल्या घाटाचा लिलाव होऊ द्यायाचा नाही आणि त्यातून लाखो रुपयांच्या खनिजाची दिवसाढवळ्या चोरी करायाची हा धंदा या क्षेत्रात वषार्नुवर्ष सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)