मोहफुलावरील बंदी उठली, मात्र खरेदी सुरू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:25+5:302021-08-28T04:39:25+5:30
तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. येथील जंगलात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोहफुल वेचण्याचे काम येथील आदिवासी ...
तुमसर तालुक्यासह जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. येथील जंगलात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोहफुल वेचण्याचे काम येथील आदिवासी बांधव करतात. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर मोहफुलांची झाडे आहेत. त्यामुळे शेतकऱ्याकडून मोहफुल जमा करण्यात येतो. यापूर्वी मोहफुलावर बंदी होती. परंतु राज्य शासनाने त्यावरून बंदी उठवली. त्यामुळे आदिवासी बांधवांचा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सहा महिन्यापासून मोहफुल खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नाही. तसे कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांना व शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना मोहफुल कमी किमतीत विकावे लागते. त्यामुळे आदिवासी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे.
तुमसर तालुक्यात शासन दप्तरी ४४ गावे आदिवासीबहुल असल्याची नोंद आहे. या गावातील आदिवासी बांधव मोहफुल जमा करतात. शासनाने मोहफुलावरून बंदी हटविली. परंतु मोहफुल खरेदी केंद्र सुरू न केल्याने सदर आदिवासी बांधव व्यापाऱ्यांना आपले मोहफुल कमी किमतीत विक्री करत आहेत.
बॉक्स
गोंदियात खरेदी, भंडाऱ्यात का नाही
गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात येत आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात मोफत खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नाही. काही वर्षापूर्वी तुमसर येथील बाजार समिती मार्केट यार्ड मोहफुलाचे लिलाव होत होते. मोठ्या प्रमाणात येथे मोफत विक्री करता येत होती. त्याच धर्तीवर बाजार समिती मार्केट यार्डात मोहफुल खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शासकीय तथा खाजगी क्षेत्रातही उद्योगाला परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊन मोहफुलाला चांगला भाव मिळेल.