बँक कर्मचाऱ्याने ५० लाखांनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:21 AM2017-07-23T00:21:10+5:302017-07-23T00:21:10+5:30
बँकेत आलेले धनादेश स्वत:च्या नावावर जमा करून रक्कम गहाळ करण्याचा गोरखधंदा भंडारा शहरातील अॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत उघडकीस आला.
अॅक्सिस बँकेतील प्रकार : आरोपीला २५ पर्यंत पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बँकेत आलेले धनादेश स्वत:च्या नावावर जमा करून रक्कम गहाळ करण्याचा गोरखधंदा भंडारा शहरातील अॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत उघडकीस आला. यात बँकेतील अस्थायी डेटा आॅपरेटरने हा प्रकार केला असून त्याने ५० लाखांनी गंडविले. याप्रकरणी त्याला अटक केली आहे.
रत्नाकर नंदनवार (२२) असे आरोपी डेटा आॅपरेटरचे नाव आहे. भंडारा शहरातील अॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत नोव्हेंबर २०१६ पासून मे २०१७ पर्यंत डेटा आॅपरेटर म्हणून अस्थायी स्वरूपात रूजू झाला. एक्सिस बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या बँक धनादेश खातेधारांनी एलआयसीच्या किस्तीची रक्कम धनादेशातून वठविण्याकरिता बँकेत जमा केले. या धनादेशाऐवजी बनावट धनादेश बनवून त्या धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढल्याचा गोरखधंदा रत्नाकर नंदनवार याने सुरू केला. असे एक ना दोन तब्बल ४१ धनादेश स्वत:च्या नावावर जमा केले. यानंतर बिंग फुटू नये म्हणून विड्रॉलनंतर बनावट धनादेश काढून त्याऐवजी ओरिजनल धनादेश लावून कोअर बँकेची फाईल तयार करीत होता. अशा ४१ धनादेशातून रत्नाकरने ४८ लाख ५० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करून बँक धनादेश ग्राहकांना गंडविले. दरम्यान त्याने या रक्कमेतून १७ लाख रूपये किंमतीची महागडी होंडा सिटी चारचाकी वाहन, एक लाखाची दुचाकी, दीड ते दोन लाख रूपये किंमतीचे एअर कंडीशनर, महागड्या घड्याळी व चैनीच्या वस्तुवर रक्कम उधळली. दरम्यान ज्या खातेदारांनी एलआयसीची रक्कम भरली ती रक्कम त्यांच्या खात्यातून वळती झाली. मात्र ती एलआयसीच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे खातेदारांनी याची चौकशी केली असता हा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी रत्नाकरविरूद्ध भादंवि ४२०, ४७१, ४०८, ४०९, कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे करीत आहे.