बारव्हा आरोग्य केंद्राचा कारभार एकाच डॉक्टरवर
By admin | Published: October 21, 2016 12:39 AM2016-10-21T00:39:55+5:302016-10-21T00:39:55+5:30
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बारव्हा येथील आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांचा समावेश आहे.
बारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बारव्हा येथील आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांचा समावेश आहे. या परिसरातील गावातील शेकडो रूग्ण उपचाराकरिता या केंद्रात येत असतात. येथे दोन डॉक्टरांची नियुक्ती केली असून सहा महिन्यापासून एका डॉक्टरची जागा रिक्त आहे. महिला वैद्यकीय अधिकारी सविता मालडोंगरे येथे पाच वर्षापासून सेवा देत आहेत. रुग्णांची वाढत असलेली संख्या व दोन डॉक्टरांचा भार एकाच महिला अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे बारव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी बारव्हा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
परिसरातील गावाचा व्याप बघता बारव्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मागील कित्येक वर्षापासून सुरु आहे. या आरोग्य केंद्रात रोज शेकडो रुग्ण उपचाराकरिता येत असतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ गावांचा समावेश आहे. या गावासह अन्य ठिकाणाहूनही रुग्ण उपचाराकरिता येत असल्याने आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र येथील एका डॉक्टरची जागा मागील सहा महिन्यापासून रिक्त असल्याने एकाच डॉक्टरवर रुग्ण तपासणीचा ताण वाढत आहे.
सदर आरोग्य केंद्र हे २४ तास सेवेत असून दिवस व रात्र एकाच डॉक्टरने कसे काय करायचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष वेधून त्वरीत रिक्त जागेवर नवीन डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी बारव्हा परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)