चंद्रमोळी झोपळीतील कचराबाईला हवा घरकुलाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:25+5:302021-07-18T04:25:25+5:30
करडी(पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील फाटक्या चंद्रमोळी झोपडीत राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठुरतेची बळी ...
करडी(पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील फाटक्या चंद्रमोळी झोपडीत राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठुरतेची बळी ठरली आहे. गत २० वर्षांपासून ती घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. गरजवंताच्या पहिल्या श्रेणीसाठी पात्र असतानाही ग्रामपंचायत स्तरावरून लाभ देण्यात आले नाही. सन २०११ मध्ये झालेल्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणातही तिच्यावर अन्याय झाला. झोपडीत असतानाही 'ब' घरकूल यादीत तिचे नाव नाही. प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका तिला आजही सहन करावा लागतो आहे.
करडी येथील इंदिरानगर आंबेडकर वार्डात राहणारी कचराबाई हरीराम गाढवे ही विधवा महिला आपल्या वृद्ध आईच्या सोबतीला राहते. तिला मुलंबाळं नाहीत. त्यातच कचराबाईची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. काठ्यांचा आधार देऊन प्लास्टीकच्या फाटक्या कागदात दिवस काढीत आहे. दोन घास खाण्याचे वांदे आहेत. तळहातावर कमावणे व पानांवर खाऊन जीवनयापन करीत आहे. घर बांधण्याचे आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही. मात्र. मरणाच्या अगोदर हक्काचे घर असावे, ही त्यांची इच्छा आहे.
२० वर्षांपासून कचराबाई पडक्या झोपडीत राहतात. अनेकदा त्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती मोहाडी येथे घरकुलासाठी अर्ज दिला, परंतु प्रशासनाला जाग आलेली नाही. तीन वर्षांपूर्वी कचराबाईला इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल मिळण्याकरिता करडी ग्रामवासीयांनी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने तत्काळ घरकूल देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, परंतु आश्वासनाची पूर्तता अजूनही झालेली नाही. कचराबाईचे नाव घरकुलासाठी पात्र असलेल्या ‘ब’ यादीत नाही. त्यामुळे घरकूल देता येत नाही, असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात, परंतु पंचायत समिती व वरिष्ठ स्तरावर मागणी लावून धरण्याचे सौजन्य त्यांनी एकदाही दाखविले नाही. त्यामुळे कचराबाई अजूनही पडलेल्या झोपडीत राहण्यास विवश आहे.
बॉक्स
मोहाडी तालुक्याला १,१६९ घरकुलांचा लक्षांक प्राप्त
२०२२ पर्यंत सर्वांना घरकूल हे शासनाचे धोरण आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून ‘ब’ यादीत पात्र ठरलेल्या सर्वांना घरकूल देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. दिवाळीनंतर ‘ड’ घरकूल यादीत नाव असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना ‘ड’ यादीतील घरकुलाचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. मोहाडी तालुक्यात सुमारे १,१६९ घरकुलांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. गरिबांना हक्काचा निवारा मिळावा, या दृष्टीने प्रशासनाने कामकाजाचा वेग वाढविण्याच्या व कामात सुधारणा आणि पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
कोट
निराधार असलेल्या कचराबाई गाढवे या विधवा महिलेचे नाव घरकुलाच्या ‘ब’ यादीत नाही. पुरवणी ‘ड’ यादीत नाव आहे. दिवाळीपर्यंत ‘ड’ यादीतील घरकुल सुरू होताच, तत्काळ घरकुलाचा लाभ देता येईल.
- महेंद्र शेंडे, सरपंच, करडी.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीमुळे कचराबाईचे नुकसान झाले. जेव्हा ग्रामवासीयांनी तिच्यासाठी उपोषण केले. त्यावेळीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. ‘ड’ यादी सुरू होताच लाभ न मिळाल्यास आंदोलन केले जाईल.
- ज्ञानेश्वर ढेंगे, सामाजिक कार्यकर्ता करडी.
170721\img-20210715-wa0039.jpg
चंद्रमोळी झोपडीतील कचराबाईला हवा घरकुलाचा आधार