-तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:55 PM2017-10-09T22:55:51+5:302017-10-09T22:56:04+5:30

बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले.

-Bavantathi project collective water resources | -तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

-तर बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी

Next
ठळक मुद्देकमकासूरवासीयांचा इशारा : चार दिवस लोटूनही कारवाई शून्य, आदिवासी बांधवांचे जगणे कठीण

राहुल भुतांगे/मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या आदिवासीबहुल कमकासुर गावाचे रामपूर येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसनस्थळी कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात न आल्यामुळे आदिवासी बांधव पुनर्वसित गाव सोडून कमकासुर या स्वगावी परतले आहेत. आता या घटनेला चार दिवस लोटूनही प्रशासनाने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ‘सरकारता पाई ते आत्मा भडके मात’ असे म्हणत समस्येवर दोन दिवसात तोडगा न निघाल्यास आम्ही २४५ आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाºया बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळी कमकासूर या गावातील आदिवासी कुटुंबांना बंदुकीच्या धाकावर गावाबाहेर काढून सन २०११-१२ मध्ये रामपूर या गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले. परंतु मागील पाच वर्षांपासून पुनर्वसित गावात १८ नागरी मुलभूत सुविधांचा वाणवा आहे. घर नाही, वीज नाही, पाणी नाही आणि धड रस्तेही नाही, उपजिविकेचे असलेली शेती हिरावल्या गेल्याने उपासमारीचे संकट ओढवले आहे. सन २००६ मध्ये जमिन अधिग्रहण करून जमिनीचा अवार्ड करण्यात आला. मात्र स्थलांतरण सन २०१२ मध्ये झाल्याने सन २०१२ प्रमाणे जमिनीची किंमत देण्यात यावी, कायद्यानुसार आदिवासींना पट्टे मिळावे याकरिता आदिवासी यांचा लढा सुरूच होता.
दरम्यान मुलभूत सुविधा मिळणे बंद झाल्याने मूळगावी असलेल्या शेतीवर उदरनिर्वाह करता येईल, यासाठी पुनर्वसित गाव सोडून मूळ गावी परतले. चार दिवस लोटले तरी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीने दखल घेतली नाही. त्यामुळे या आदिवसी बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान ८ आॅक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश राहांगडाले, अशोक उईके, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी कमकासुर येथे भेट दिली असता आदिवासींच्या वास्तव जिवनाचे चित्र समोर आले. कमकासूर येथे प्रकल्पग्रस्तांची घरे पडलेली आहेत. तिथे तात्पुरते शेड असून अंधाराच्या काळोख्यात वन्यप्राण्यांच्या सावटात, हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जगणे सुरू आहे. या जगण्याला वैतागलेल्या कचरू नेताम या आदिवासी बांधवाने सर्वांसमोर बावनथडी प्रकल्पातच उडी घेतली. मात्र प्रसंगावधानाने त्याला बाहेर काढून त्याची समजूत काढण्यात आली. आता आणखी किती दिवस वाट पाहावे, असे म्हणत दोन दिवसात तोडगा न निघाल्यास कमकासुर येथील २४५ ही आदिवासी बांधव बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मागे वळून पाहायचे नाही. सर्व प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेणार आहे.
- किशोर उईके, सरपंच कमकासुर.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय खपवून घेणार नाही. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवदने पाठविली आहेत. वेळप्रसंगी आदिवासीकरिता रस्त्यावरही उतरण्याची तयारी आहे.
- राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख शिवसेना.
रामपूर व गर्रा बघेडा पुनर्वसनस्थळावर मुलभूत सुविधांची माहिती घेण्यात आली. उपजिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आढावा घेऊन समस्या निकाली काढण्यात येईल.
- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.

Web Title: -Bavantathi project collective water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.